साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती

साठे, अण्णाभाऊ : (१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९ ). कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर, ख्यातनाम मराठी साहित्यिक. अण्णाभाऊंचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगावचा, उपेक्षित समजल्या गेलेल्या मातंग समाजातील. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा जि. सांगली ). त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. मुंबईत डॉ...