डॉ. ए. पी . जे. अब्दुल कलाम
https://www.biographymarathi.com/2020/07/Apj-kalam-biography.html
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर अप्रतिम निबंध | APJ Abdul Kalam Marathi Nibandh |
भारताचे अकरावे राष्ट्रपती, मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे संपूर्ण नाव अबुल पाकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम आहे. त्यांचा जन्म तामिळनाडूत रामेश्वरम् येथे १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. त्यांचा जन्मदिवस हा जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.
ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एरोनॉटिकल इंजिनिअर होते. ते विद्यार्थीदशेत असताना कुशाग्र बुद्धीचे धनी होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उच्च शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यांचे माध्यमिक शिक्षण रामनाथपुरम येथे झाले. त्यानंतर त्यांनी सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी घेतली. एरोस्पेस तंत्रज्ञानाबद्दल त्यांना प्रचंड आवड होती.
एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा त्यांनी चेन्नई येथे पूर्ण केला. तो पूर्ण करण्यासाठी त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवले होते. एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी त्यानंतर संरक्षण संशोधन व विकास संस्था ( DRDO ) मध्ये १९५८ ते १९६३ यादरम्यान कार्य केले.
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) या संशोधन क्षेत्रात काम पाहू लागले. “अग्नी” या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे ते खूपच प्रसिद्ध झाले.
त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखण्यात येऊ लागले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाची धोरणे आखली. त्यानंतर संरक्षण मंत्री, वैज्ञानिक सल्लागार आणि डी. आर. डी. ओ. चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन ( main battle tank ) हा रणगाडा व लाईट काँबॅट एअरक्राफ्ट या दोन्हींच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली.भारतातील प्रमुख वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध होत चाललेले कलाम हे स्वभावाने खूपच साधे आणि संवेदनशील होते. त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. डॉ. कलाम हे अविवाहित आणि शाकाहारी होते. त्यांच्याकडे खूप संपत्ती देखील नव्हती. भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न ते बाळगून होते. त्यांचे विचार, भाषणे ही युवकांना खूप भावत असत. भारतीय तसेच जगभरातील युवकांचे ते प्रेरणास्थान होते. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ व ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे.
राष्ट्रपतीपद पाहिल्यानंतर कलाम हे भारतातील नामांकित विद्यापीठांमध्ये विसिटींग प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यांनी संशोधन व तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान असे विषय यादरम्यान हाताळले. त्यांची विज्ञानविषयक भाषणे खूप प्रसिद्ध आहेत. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन म्हणजे संपूर्ण भारतीय युवा पिढीसाठी प्रेरक असेच आहे. असा हा मिसाईल मॅन २७ जुलै २०१५ रोजी अनंतात विलीन झाला.
Comments
Post a Comment