शैक्षणिक मूल्यमापन (Educational Evaluation)
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात आत्मसात केली आहेत, हे शोधून काढण्याची एक पद्घतशीर प्रक्रिया. मूल्यमापन म्हणजे केवळ निरीक्षण नव्हे, तर एक वस्तुनिष्ठ पद्घतशीर प्रक्रिया आहे. ज्या शैक्षणिक कार्यक्रमाचे मूल्यमापन करावयाचे असते, त्या कार्यक्रमाची काही उद्दिष्टे अगोदर ठरविलेली असतात. मूल्यमापन ही एक सर्वसमावेशक स्वरूपाची प्रक्रिया असून तीत विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये घडलेला मापनीय बदल व त्याचा अन्वय या दोन्ही गोष्टी समाविष्ट होतात.
मूल्यमापनाचे विविध उपयोग : शैक्षणिक मूल्यमापनाचे पुष्कळ उपयोग ज्ञात आहेत. त्यांतील काही पुढीलप्रमाणे :
- विद्यार्थ्यांची प्रगती कोणत्या टप्प्यापर्यंत झाली आहे, हे कळण्यास मूल्यमापन उपयोगी पडते. त्यामुळे विद्यार्थी योग्य दिशेने प्रगती करत आहे किंवा नाही, याचा मागोवा घेणे शिक्षकांना शक्य होते. ठरविलेल्या उद्दिष्टांच्या दिशेने विद्यार्थ्यांची प्रगती होत नसेल, तर वेळीच काही उपाययोजना करणे शिक्षकांना शक्य असते.
- जर मूल्यमापन योग्य तऱ्हेने आयोजित करून कार्यवाही केली, तर विद्यार्थ्यांना त्यापासून प्रेरणा मिळते. आपण ज्या हेतूने प्रयत्न करीत आहोत, त्यात यश मिळत आहे, असे दिसल्यानंतर साहजिकच विद्यार्थ्यांना अधिक प्रयत्न करण्यास उत्साह वाटतो.
- शिक्षकांची अध्यापनातील कार्यक्षमता तपासण्याच्या दृष्टीने मूल्यमापन उपयुक्त असते. वर्गामध्ये जी अध्ययन-अध्यापन क्रिया चालू असते, जी विविध साधने वापरली जातात, ज्या तऱ्हेने शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रिया चालू असते, त्या सर्व गोष्टी योग्य तऱ्हेने चालू आहेत किंवा नाहीत याचेही मूल्यमापन करता येते.
- शाळा-महाविद्यालये चालविणाऱ्यांना अधूनमधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल पालकांकडे काही खुलासा करावा लागतो. विद्यार्थ्यांची प्रगती नेमकी कोणत्या पातळीपर्यंत झाली आहे, हे पालकांना कळण्यासही मूल्यमापनाचा उपयोग होतो.
- सर्वसमावेशक स्वरूपाचे मूल्यमापन शालेय व्यवस्थापनातही उपयुक्त ठरते. शाळेने जे उद्दिष्ट ठरविलेले असते, ते साध्य झाले आहे किंवा नाही, अभ्यासक्रमाची बळकट बाजू कोणती व त्यातील कमकुवत बाजू कोणती इत्यादी बाबी कळणे मुख्याध्यापकांनाही शक्य होते. तसेच शाळेमध्ये जे विविध कार्यक्रम होतात, त्यांचीही परिणामकारकता मुख्याध्यापकांच्या ध्यानी येऊ शकते.
मूल्यमापनाची सर्वसाधारण तत्त्वे : मूल्यमापन म्हणजे केवळ वेगवेगळी साधने तयार करून त्यांच्या साहाय्याने मिळविलेले वृत्त नव्हे. ती एक प्रक्रिया असून उद्योगधंद्यांमध्ये ज्या हेतूने विचार करतात, तसाच विचार शिक्षणामध्येही करणे आवश्यक मानले जाते. उदा., या व्यवहारामध्ये कोणती गुंतवणूक करण्यात आलेली आहे, या व्यवहारातील प्रकियेचे स्वरूप काय आहे, तसेच या प्रकियेचे फलित कोणते आहे अशा हेतूने विचार करणे शिक्षणामध्येही आवश्यक असते. गुंतवणूक-प्रक्रिया-फलित या पद्धतीने मूल्यमापनाची काही सर्वसाधारण तत्त्वे पुढीलप्रमाणे सांगता येतील :
- आपण मूल्यमापन कशासाठी करतो आहोत, हे नक्की ठरल्याखेरीज मूल्यमापनाची साधने तयार करू नयेत किंवा वापरू नयेत.
- वेगवेगळी उद्दिष्टे तपासण्यासाठी वेगवेगळी मूल्यमापनसाधने वापरावी लागतात. उदा., रसायनशास्त्रातील ज्ञानाची प्रगती तपासत असताना केवळ लेखी परीक्षा पुरेशी ठरणार नाही. त्यासाठी प्रयोगपरीक्षेचाही अवलंब करावा लागेल. एम. फिल., पीएच. डी. यांसारख्या परीक्षांमध्ये लेखी परीक्षेबरोबर तोंडी परीक्षा, स्वतंत्रपणे प्रबंध लिहिण्याची परीक्षा अशा अनेक गोष्टी सामावलेल्या असतात. उद्दिष्टांशी सुसंगत अशीच मूल्यमापनसाधने निवडावी लागतात.
- सर्वसमावेशक मूल्यमापनासाठी एकाच मूल्यमापनसाधनाचा उपयोग करून चालत नाही. विद्यार्थ्यांची जी विविधांगी प्रगती झालेली असते, तिचे सम्यक चित्र हवे असल्यास विविध मूल्यमापन तंत्रांचा उपयोग करावा लागतो.
- प्रत्येक मूल्यमापनसाधनाचे काही एक वैशिष्ट्य असते, तसेच त्याची काही मर्यादाही असते. त्यामुळे एखादे साधन किंवा तंत्र वापरताना त्याच्या या दोन्ही बाजू लक्षात घेणे इष्ट ठरते. लेखी परीक्षेचा वापर केला असता त्यातून कारक-कौशल्ये तपासली जाणार नाहीत, हे उघडच आहे. तसेच प्रयोगशाळेतील प्रयोगातून विद्यार्थ्याने योग्य अभिवृत्ती धारण केली की नाही, ते कळेलच असे नाही.
- अलीकडच्या काळात संपूर्ण शैक्षणिक प्रक्रिया परीक्षार्थी झाली आहे, असे वाटते. प्रत्येक गोष्ट ही परीक्षेतील यशाकरिता व त्यामुळे मिळणाऱ्या प्रतिष्ठेकरिता चाललेली आहे, असे दिसते. मूल्यमापनाचा हा विपरीत परिणाम म्हटला पाहिजे. मूल्यमापन हे साध्य नव्हे, ते साधन आहे.
- मूल्यमापनाकरिता वेगवेगळ्या साधनांप्रमाणेच वेगवेगळ्या पद्धतीही वापरता येतात. उदा., चाचण्या घेणे, स्वयंअहवाल-तंत्रे आणि निरीक्षणतंत्रे वापरणे इत्यादी. मूल्यमापनासाठी साधनांचे प्रकार आणि ती वापरावयाची तंत्रे या दोहोंचाही साकल्याने विचार करावा लागतो.
शैक्षणिक मूल्यमापनाचे काही पैलू : शैक्षणिक मूल्यमापनाच्या संदर्भातील काही मूलभूत मुद्दे पुढीलप्रमाणे :
- कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्टपणे व्याख्यात केल्याशिवाय शैक्षणिक मूल्यमापनाचा विचारच होऊ शकत नाही.
- शैक्षणिक कार्यक्रमाची उद्दिष्टे ठरल्यानंतर अध्ययन-अध्यापन प्रक्रिया त्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे किंवा नाही याचा विचार करावा लागतो. रसायनशास्त्रात खनिज लोखंडापासून शुद्घ पोलाद कसे तयार करतात, अशा प्रकारचा धडा असला, तर या लोखंडाचे किंवा पोलादाचे रासायनिक रूप माहीत असणे, त्यांमध्ये कोणती रसायने वापरली जातात, कोणत्या प्रक्रिया केल्या जातात, किती उष्णता लागते इत्यादी गोष्टींची सांगोपांग चर्चा नसेल, तर खनिज लोखंडापासून शुद्घ पोलाद कसे तयार करतात, हे विद्यार्थ्यांना कधीच यथार्थपणे समजू शकणार नाही. प्रौढ-शिक्षणाच्या अनौपचारिक कार्यक्रमात जाणीवजागृती आणि कार्यात्मकता ही उद्दिष्टे मानलेली आहेत. प्रत्यक्षात मात्र अनेकदा प्रौढशिक्षण वर्गात केवळ साक्षरतेचे तास होतात. त्यामुळे जाणीवजागृती आणि कार्यात्मकता यांच्या संदर्भात प्रौढशिक्षणाचे मूल्यमापन कसे करता येईल? थोडक्यात वर्गातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया उद्दिष्टांशी सुसंवादी असली पाहिजे.
- वर्गामध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रिया चालू असता, विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये कोणता बदल अपेक्षित आहे, याची जाणीव शिक्षकांना असली पाहिजे. तसेच हा बदल शिक्षणाच्या उद्दिष्टांशी संबंधित आहे किंवा नाही, याचाही मागोवा घेतला पाहिजे. पुष्कळ वेळा असे घडते की, विद्यार्थ्यांच्या वर्तनातील अपेक्षित बदलाचा विचार करीत असताना मूळ उद्दिष्टांचा मागमूसही शिल्लक राहात नाही. म्हणूनच एखाद्या शैक्षणिक कार्यक्रमाची उद्दिष्टे निश्चित झाल्यानंतर त्यांच्याशी सुसंगत अशी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनातील अपेक्षित बदल यांची शिक्षकांना योग्य कल्पना असली पाहिजे.
- एकदा कोणता बदल अपेक्षित आहे, हे नक्की ठरल्यानंतर हे बदल कसे मोजायचे, याबद्दलची साधने किंवा तंत्रे ठरविता येतात. सामान्यत: ज्ञान, कौशल्ये आणि वृत्ती अशा प्रकारची उद्दिष्टे असतात. या उद्दिष्टांशी सुसंगत ठरणारे वर्तनबदल वेगवेगळे असतात. उदा., सामाजिक समता याविषयी माहिती मिळाली, समतेचे कार्यक्रम कसे आयोजित करावे हे कळले, समतेबद्दल एक उदार दृष्टिकोण तयार झाला की, या तिनही वर्तनबदलांसाठी वेगवेगळ्या मूल्यमापन साधनांची उपाययोजना करणे आवश्यक असते.
शैक्षणिक मूल्यमापनाची साधने व तंत्रे : शैक्षणिक मूल्यमापनात विविध साधनांचा व तंत्रांचा उपयोग केला जातो. विद्यार्थ्यांचे वय, शैक्षणिक पातळी, उद्दिष्टाचे स्वरूप इत्यादींवर साधनांची वा तंत्रांची निवड अवलंबून असते. विविध प्रकारच्या कसोट्या (शिक्षक-रचित, प्रमाणित निष्पादन कसोट्या, बुद्धिमापन कसोट्या, निदानात्मक कसोट्या), पडताळासूची, शोधिका, पदनिश्चयन श्रेणी, मुलाखत अनुसूची, प्रश्नावली, संचयी नोंद, घटनाभिलेख, प्रक्षेपण कसोट्या, ज्ञानरचनावादी साहित्य इत्यादी मूल्यमापनाची साधने होत. लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, मुलाखत, निरीक्षण, प्रकल्पपद्धती, समाजमिती इत्यादी मूल्यमापनाची तंत्रे होत. आधुनिक काळात मूल्यमापनासाठी विविध तंत्रे व साधने वापरतात. त्यामुळे मूल्यमापन अधिक विश्वसनीय होते; मात्र कोणत्याही साधनाकरिता किंवा कसोटीकरिता यथार्थता, विश्वसनीयता, योग्यता, सुसाध्यता, भेदनशक्ती आणि प्रमाणीकरण हे गुण आवश्यक ठरतात.
Comments
Post a Comment