लालबहादूर शास्त्री
लालबहादूर शास्त्री (२ ऑक्टोबर १९०४ - ११ जानेवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते, थोर राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान (९ जून १९६४-११ जानेवारी १९६६). त्यांचे आडनाव श्रीवास्तव, पण त्यांनी या आडनावाचा व्यवहारात कधीही उपयोग केल्याचे आढळत नाही. त्यांचा जन्म बनारसजवळील मोगलसराई या रेल्वे वसाहतीत शारदाप्रसाद व रामदुलरिदेवी या दांपत्याच्या पोटी सामान्य कायस्थ कुटुंबात झाला. वडील शारदाप्रसाद सुरूवातीस प्राथमिक शिक्षक होते; पुढे ते शासकीय लिपिक झाले. आई पारंपरिक धार्मिक वृत्तीच्या होत्या. लालबहादूर दीड वर्षाचे असताना वडील वारले. तेव्हा हे कुटुंब बनारसजवळ रामनगरला स्थायिक झाले. हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये ते मॅट्रिकला असताना म. गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली (१९२१). शास्त्रींनी शाळा सोडली व म. गांधींच्या विचारसरणीकडे ते आकृष्ट झाले. पुढे त्यांना महात्मा गांधींचा सहवास लाभला व ते पूर्णतः गांधीवादी बनले. त्यांनी महत् कष्टाने काशी विद्यापीठातून तत्त्वज्ञान या विषयात पहिल्या वर्गात शास्त्री ही पदवी मिळविली (१९२५). विद्यार्थिदशेत डॉ. भगवानदास, गोपालशास्त्री या अध्यापकां...