Tuesday, July 13, 2021

गोपाळ गणेश आगरकर

आगरकर, गोपाळ गणेश : (१४ जुलै १८५६–‒१७ जून १८९५). एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी गरीब घराण्यात झाला. खेळणे, पोहणे, वाचणे यांत त्यांचे बालपण गेले. हालअपेष्टांना तोंड देत कराड, रत्‍नागिरी, अकोला आणि पुणे येथे राहून ते एम्‌. ए. झाले. अकोल्याच्या विष्णू मोरेश्वर महाजनींचे त्यांस मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यात निर्माण केलेल्या जहाल विचारांच्या राष्ट्रवादी पंथास ते लोकमान्य टिळकांसह जाऊन मिळाले. लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी या तिघांनी पुण्यात ‘न्यू इंग्‍लिश स्कूल’ स्थापन केले (१८८०), तसेच केसरी आणि मराठा (इंग्रजी) ही पत्रे चालू केली (१८८१). न्यू इंग्‍लिश स्कूलमध्ये आगरकरांनी अध्यापनाचे काम केले. त्याचप्रमाणे केसरीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारून परिणामकारक लेखन आणि कुशल संपादन यांच्या जोरावर अल्पावधीतच केसरीला लोकप्रियता प्राप्त करून दिली. न्यू इंग्‍लिश स्कूलच्या चालकांनी स्थापन केलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ च्या ‘फर्ग्युसन महाविद्यालया’चे प्राचार्य (१८९२) म्हणूनही त्यांनी अखेरपर्यंत काम केले.

महाविद्यालयीन जीवनातच जेरेमी बेंथम, जॉन स्ट्यूअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी त्यांचे मन संस्कारित झाल्यामुळे त्यांचा दृष्टीकोन उदारमतवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी झालेला होता. याच दृष्टीकोनातून तत्कालीन समाजाची शिलावस्था त्यांना जाचत होती व समाज जागृती करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती. केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखांतून हीच भूमिका व्यक्त होऊ लागली. सामाजिक प्रश्नांच्या जाणिवेपेक्षा राजकीय प्रश्नांची जाणीव अधिक तीव्र असली पाहिजे, असे केसरी व मराठाच्या चालकमंडळींस वाटत असल्यामुळे, आगरकरांचा वैचारिक कोंडमारा होऊ लागला. परिणामत: ते केसरीतून बाहेर पडले (१८८७) आणि आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रतिपादन-प्रसारासाठी सुधारक हे पत्र त्यांनी काढले (१८८८). त्यात राजकीय व अर्थशास्त्रविषयक लेखही येत.

बुद्धिवादी दृष्टीकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय्य रूढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ले चढविले. बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणताही निकष ते मानीत नसल्यामुळे समाजसुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते. नीतिमान आणि सदाचरणी समाजाच्या निर्मितीसाठी ईश्वर आणि धर्म यांचीही आवश्यकता त्यांना वाटत नव्हती. परोपकारादी सद्गुण धर्माच्या आधी अस्तित्वात आले असून नंतर धर्मात ते गोवले गेले, अशी त्यांची भूमिका होती. बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता, स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टी, इहवाद आणि मानवतावाद या सप्त:सूत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला आहे. साहजिकच, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता आणि चातुर्वर्ण्य, जातिसंस्था, अस्पृश्यता, बालविवाह, ठरवून केलेले विवाह इ. गोष्टी त्यांना सर्वथैव अमान्य होत्या. मुला-मुलींस समान शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम व व्यवसायाभिमुख शिक्षण द्यावे, दुष्ट आचारांचे निर्मूलन करावे, सदाचाराचा प्रसार करावा, ज्ञानवृद्धी करावी, सत्यसंशोधन करावी, भूतदया राखावी यासाठी ते प्रयत्नशील होते. मनुष्यजातीचे ऐहिक सुखवर्धन हेच त्यांचे ध्येय बनले होते. तथापि निव्वळ इंद्रियसुखालाच ऐहिक सुख मानण्याइतपत त्यांची दृष्टी संकुचित नव्हती. नीतिमान आणि संयमी जीवनामुळे मनाला लाभणारे समाधानही या ऐहिक सुखात त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिस्वातंत्र्यामुळे स्वार्थ आणि स्वैराचार फैलावण्याऐवजी समाजातील व्यक्ती परोपकारी आणि परहितचिंतकच होतील, असे त्यांना वाटे. उलट व्यक्तिस्वातंत्र्य न मानणाऱ्या व निरुपयोगी परंपरांनी वेढलेल्या समाजाची केव्हाही प्रगती होऊ शकणार नाही, अशी त्यांची धारणा होती. परंपरांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता; त्यामुळे एखादी गोष्ट समाजाच्या एका अवस्थेत उपयुक्त ठरली असेल, हे ते मान्य करीत; मात्र तीच गोष्ट बदलत्या काळात जाचक ठरल्यास बिनदिक्कतपणे टाकून द्यावी, असे ते म्हणत. अशा रूढी आणि परंपरा स्वखुषीने सोडून द्यावयास समाज तयार नसेल, तर त्या सरकारी मदतीने कायदेशीर रीत्या नाहीशा कराव्या, असे त्यांचे मत होते. “ज्या देशातील हजारो पिढ्यांनी अनेक गोष्टीत मोठ्या कष्टाने केलेल्या अनेक सुधारणांचे फळ आपणास आयतेच प्राप्त झाले अशा अनेक देशांतील धर्मांचा, रितीरिवाजांचा व लोकांचा सर्वथैव त्याग करणाऱ्या मनुष्यास खऱ्या सुधारकाची पदवी कधीही शोभणार नाही”, हे त्यांचे म्हणणे महत्त्वाचे आहे. केवळ धर्मच नव्हे, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सारासार विचार करून आंधळेपणाने गतानुगतिक वर्तन नाकारून जाणीवपूर्वक योग्य त्या मार्गाची निवड करण्याचा पुरस्कार करणारे आगरकर बुद्धिवादी संत किंवा देव न मानणारे देवमाणूस मानले जातात.

आगरकरांचे विचार तत्कालीन अंधश्रद्ध सामान्यांना समजले नाहीतच. तथापि टिळकांसारख्या सुशिक्षित आणि चिंतनशील व्यक्तींचाही त्यांना पाठिंवा मिळू शकला नाही. जनतेचे लक्ष समाजक्रांतीवर केंद्रित करून त्यात तिची शक्ती वाया घालवण्यापेक्षा आधी राजकीय स्वातंत्र्यासाठी तिचा उपयोग करून घ्‍यावा, तसेच सामाजिक रूढींच्या प्रश्नावर लोकांची मने दुखवून राजकीय चळवळीत फूट पाडू नये, असे टिळकांना वाटे. ईश्वर आणि धर्म यांच्याविषयीचे आगरकरांचे विचार रा. गो. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांसारख्या सुधारक व्यक्तींनाही पटत नसत. सुधारकातील लेखांविरुद्ध चहुबाजूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. खुनाच्या धमक्या, प्रेतयात्रा काढणे इ. प्रकार झाले; परंतु  ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’, या भूमिकेतून सामाजिक सुधारणांचा कडवा पुरस्कार त्यांनी आमरण चालू ठेवला. सुधारकातील लेखांतून त्यांचे समाजजीवनाच्या विविध अंगांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन प्रत्ययास येते. स्त्री-पुरुषांचा पोषाख, विधवांचे केशवपन, सोवळे-ओवळे, अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार, केशकर्तन, पायतणे इ. विषय जसे त्यांत आहेत, तसेच देवतांची उत्पत्ती, मूर्तिपूजा, आत्म्याची मरणोत्तर स्थिती इत्यादींसारखे तात्त्विक आणि धर्माशी निकटचा संबंध असलेले विषयही आहेत. सामाजिक सुधारणा आणि कायदा यांचे संबंध काय असावेत, यासंबंधीची आपली भूमिका मांडण्यासाठी आणि समाजहितकारक कायद्यांच्या जोरदार पुरस्कारासाठी काही लेख लिहिले गेले आहेत; तर काही लेखांतून सामाजिक गुलामगिरीने जखडून गेलेल्या स्त्रियांच्या शिक्षणादी समस्यांविषयी मूलगामी विचार आलेले आहेत.

समाजोन्नतीचा ध्यास असल्याने समाजचिंतन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव होता. तसेच राजकीय विचारांच्या जहालपणात ते टिळकांच्या बरोबरच होते. राजकीय हक्क आणि राजकीय स्वातंत्र्य यांची तीव्र जाणीव त्यांच्या लेखांतून स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेली आहे. चिपळूणकर निवर्तल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय विचारजागृती घडवून आणण्याचे काम केसरीतून बाहेर पडेपर्यंत त्यांनीच केले.

आपल्या वैचारिक लेखांनी मराठीतील निबंधसाहित्यात त्यांनी मोलाची भर घातली, पल्लेदार वाक्ये, मुद्देसूद प्रतिपादन, अन्वर्थक अलंकार आणि प्रासंगिक नर्मविनोद ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये. केशवसुत, ह. ना. आपटे यांसारख्या थोर साहित्यिकांवर आगरकरांचा वैचारिक व भाषिक प्रभाव होता. “ज्याने आपल्या बुद्धिसामर्थ्याने व साधुत्वाने जगास वश केले, तो खरा शास्ता” हे आगरकरांचे म्हणणे त्यांच्या वैचारिक व भाषिक क्षमतेचे निदर्शक आहे. त्यांच्या ‘कवि, काव्य, काव्यरति’ आणि ‘शेक्सपिअर, भवभूति व कालिदास’ यांसारख्या साहित्यविषयक निबंधांनी आजच्या काही टीकाकारांचे लक्ष वेधून घेतले असून त्यांनी आगरकरांना साहित्यशास्त्रातील काही मूलभूत तत्त्वांचा शास्त्रीय पद्धतीने विचार करणारे विचारवंत मानले आहे. काव्य आणि संवेदना यांचा विशेष संबंध, काव्यातील सत्य आणि शास्त्रीय सत्य, काव्यातील करुणरस, कविमन आणि काव्यनिर्मितिप्रक्रिया इत्यादींसंबंधीचे त्यांचे विचार या दृष्टीने कक्षणीय ठरतात. त्यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत : विकारविलसित अथवा शेक्सपीअरकृत हॅम्लेट नाटकाचे भाषांतर (१८८३), डोंगरीच्या तुरुंगांत आमचे १०१ दिवस (१८८२), शेठ माधवदास रघुनाथदास व बाई धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहचरित्र (१९०७), वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करणविकारविलासिताच्या प्रदीर्घ प्रस्तावंनेत परक्या भाषेतील नाट्यकृतींची मराठी भाषांतरे कशी करावी, यासंबंधीची मते त्यांनी मांडली आहेत. ‘कोल्हापूर प्रकरणा’वरून १८८२त डोंगरी येथे टिळकांसह कारावास भोगत असतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी डोंगरीच्या तुरुंगांत मध्ये खेळकर आणि विनोदी शैलीत सांगितले आहेत. मराठी वाक्याचे निरनिराळे अवयव आणि त्यांचे परस्परसंबंध यांचा तपशीलवार विचार त्यांनीच मराठीत प्रथम आणला. त्यांचे केसरीतील निवडक निबंध (१८८७) आणि सुधारकातील वेचक लेख (निबंधसंग्रह १८९५) प्रसिद्ध झाले आहेत. साहित्य अकादेमीनेही त्यांचे काही लेख प्रसिद्ध केले आहेत. यशोदाबाई फडके यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या आगरकरांना दांपत्यजीवनात दु:ख, दारिद्र्य, संकटे आल्याने बौद्धिक वातावरण नसल्याची खंत होती. दम्याच्या विकाराने पुणे येथे ते निधन पावले.

“चांगली राजकीय स्थिती ही चांगल्या गृहस्थितीचे व धर्मपद्धतीचे फळ आहे. सबब या दोहोंच्या सुधारणेस प्रथम लागले पाहिजे. कर्तव्यबुद्धी व परोपकारबुद्धी पूर्णपणे जागृत झाली असेल, त्यांनी आपापल्या देशाचा जीवनार्थ कलहात टिकाव लागण्यासाठी रात्रंदिवस निरपेक्ष बुद्धीने झटले पाहिजे”, असे आगरकर म्हणतात.

‘देवाची कल्पना माणसाचीच’ असे आगरकर म्हणतात. “आकाशातून देव येथे कधी आले नाहीत, येथून परत कधी गेले नाहीत. आम्हीच त्यांना येथल्या येथे निर्माण करतो, त्यांच्या गुणांचे पोवाडे गातो आणि चाहील (हवे) तेव्हा त्यांस नाहीसे करतो” असे त्यांनी ह्या संदर्भात नमूद केले आहे. “अनेकत्वानंतर एकत्वाची, स्थूलानंतर सूक्ष्माची, जड़ानंतर चिद्रूपाची, साकारानंतर निराकाराची, इंद्रियगोचरानंतर अतींद्रिय ज्ञानाची, व्यक्तानंतर अव्यक्ताची व गम्यानंतर अगम्याची कल्पना मनुष्याच्या अधिकाधिक विकास पावत जाणाऱ्या बुद्धीस येणे हेच अत्यंत स्वाभाविक आहे.” पुढे वेदान्त विचारांच्या कुंडात पेटलेल्या अग्नीत हे द्वैतही खाक होऊन जाते आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ एवढा अनिर्वचनीय विचारच फक्त शिल्लक उरतो. हा धर्मविचारांचा कळस होय. त्यामुळे धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अमानुष, अघोरी, जुलमी प्रकाराना त्यांनी कड़ाडून विरोध केला. “सोवळ्याओवळ्याचा बडेजाव करणे… म्हणजे व्यवहारात नसत्या अडचणी उपस्थित करणे आणि वर्गावर्गात सलोखा न होण्यासारखी अट घालून ठेवण्यासारखे होय.” मात्र “स्वभूमीत, स्वलोकात, स्वधर्मात आणि स्वचारात राहून अविचारी आणि अज्ञानी देशबांधवांच्या निंदेस किंवा छळास न भिता त्यांच्याशी कधी भांडून, कधी युक्तिवाद करून, कधी लाडीगोडी लावून अथवा सामर्थ्य असल्यास कधी त्यांना दटावून त्यांची सुधारणा करणे यातच खरी देशप्रीती, खरी बंधुता, खरा देशाभिमान, खरे शहानपण व खरा पुरुषार्थ आहे.”

‘यतो वाचो निवर्तन्ते…’ सारख्या औपनिषदिक वचन उद्धृत केल्याने आगरकरांना अज्ञेयवादी मानले जाते. परमतत्त्व निर्गुण निराकार अनिवर्चनीय म्हणजे अज्ञेय हे मान्य केले की, आगरकर स्पेन्सरप्रमाणे अज्ञेयवादी किंवा पारलौकिकाविषयी शंका उपस्थित केल्याने ह्यूमप्रमाणे संशयवादी मानले जातात. इहवादी, इहनिष्ठ, विवेकी असे हे समतेचे तत्त्वज्ञान अस्पृश्यता निवारणासाठी मोलाचे कार्य करते.

संदर्भ :

  • Ganachari, Aravind, Gopal Ganesh Agarkar : The Secular Rationalist Reformer, Pune, 2005.
  • अळतेकर, मा. दा. संपा. संपूर्ण आगरकर ३ भाग, पुणे, दु. आवृ. १९३७, १९१७, १९१८.
  • खांडेकर, वि. स. संपा. आगरकर, व्यक्ति आणि विचार, पुणे, १९४५.
  • गर्गे, स. मा. गोपाळ गणेश आगरकर, नवी दिल्ली, १९९६.
  • गोखले, पु. पां. आगरकर चरित्र, पुणे, १९४४.
  • देशपांडे, दि. य.; नातू, म. गं. आगरकर वाङ्मय, तीन खंड, मुंबई, १९८४.
  • देशपांडे, सुनंदा, गोपाळ गणेश आगरकर, पुणे, १९८३.
  • प्रधान, ग. प्र. गो. ग. आगरकर : निवडक लेखसंग्रह, पुणे, २००६.
  • फडके, य. दि. शोध बाळगोपाळांचा, पुणे, २००४.
  • भोळे, भा. ल. संपा. आजचा सुधारक (आगरकर विशेषांक), नागपूर, जून-जुलै १९९५.
  • सरदार, गं. बा. आगरकरांचा सामाजिक विचार, पुणे, १९७५

Monday, July 12, 2021

शैक्षणिक मानसशास्त्र

शैक्षणिक मानसशास्त्र : मानवी विकास, प्रेरणा, अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन आणि त्या संदर्भात होणाऱ्या आंतरलक्रियां- संबंधी केलेले मानसशास्त्राचे व मानसशास्त्रीय पद्धतींचे उपयोजन. उपयोजित मानसशास्त्राची एक महत्त्वाची शाखा. या शाखेत शैक्षणिक अध्ययन-अध्यापनाच्या क्षेत्रात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी संशोधन करण्यात येते. व्यक्तीच्या सुप्तगुणांचा पर्याप्त विकास होऊन ती सक्षम होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे असते, त्या त्या सर्व गोष्टींचा शैक्षणिक मानसशास्त्रात विशेषत्वाने अभ्यास केला जातो.

शैक्षणिक मानसशास्त्राच्या प्रगतीचा ऐतिहासिक आढावा घेतल्यानंतर ग्लोव्हर व रोनिंग या मानसशास्त्रज्ञांनी १९८७ साली त्याची व्याप्ती स्पष्ट केली. त्यांच्या मतानुसार या शास्त्रामध्ये मानवी विकास, व्यक्तिभेद, अध्ययन, प्रेरण, मापन या सर्वांचा समावेश होतो. हे शास्त्र सिद्धांत व प्रदत्तांपासून मिळालेले संशोधनांचे निष्कर्ष या दोहोंवर अवलंबून असते. या दृष्टीने पाहता शैक्षणिक मानसशास्त्रात अध्ययनप्रकियेच्या बाबतीत सुप्त उपयोजन फार मोठे आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट सक्षमता व व्यक्तिमत्त्व यांच्या विकासाशी व ज्ञानसंवर्धनाशी निगडित आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक मानसशास्त्रातील सिद्धांतांचे व संशोधनाचे उपयोजन औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण, मुक्त शिक्षण, प्रौढशिक्षण, अपंगांचे शिक्षण, व्यवसाय शिक्षण, दूरशिक्षण यांसारख्या सर्व प्रकारांतून करण्यात येते.

शिक्षण म्हणजे सामाजिक वास्तवाचे भान, असा अर्थ घेतल्यास शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे शैक्षणिक संस्थांचा, अभ्यासकमांचा, अध्ययनपद्धतींचा साकल्याने केलेला संशोधनात्मक अभ्यास, असे म्हणता येईल. फलनिष्पत्तीच्या दृष्टीने शिक्षणाचा विचार केल्यास, शिक्षण घेण्यास पात्र असलेले व शिक्षण पूर्ण केलेले यांचा विशेष अभ्यास शैक्षणिक मानसशास्त्र करते. व्यक्तीला व समूहाला पभावित करणारे वर्तन, असा शिक्षणाचा अर्थ घेतल्यास शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे शिक्षणविषयक परिस्थितीच्या संदर्भातील मानसशास्त्रीय घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र, असे म्हणता येईल. या संदर्भात विविध मानसशास्त्रीय तंत्रे व पद्धती विकसित केल्या जातात.

साधारणपणे विसाव्या शतकारंभी शैक्षणिक मानसशास्त्राला स्वतंत्र शास्त्रशाखेचा दर्जा प्राप्त झाला. अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली शैक्षणिक मानसशास्त्राची पहिली पाठ्यपुस्तके १८७९ (अलेक्झांडर बेन) व १८८४ (जेम्स सली) मधील आहेत. स्विस समाजसुधारक ⇨ योहान हाइन्रिक पेस्टालोत्सी याच्या विचारांचा शैक्षणिक मानसशास्त्रावर बराच प्रभाव पडला. त्याच सुमारास हॉल, एबिंगहाऊस, गॉल्टन इत्यादींनी केलेल्या संशोधनाने शैक्षणिक मानसशास्त्रास चालना मिळाली. १९०५ साली बीने-सीमोन बुद्घिमापन चाचणीने शैक्षणिक मानसशास्त्रात नवे पर्व सुरू झाले. गॉडर्ड (१९०८), टर्मन (१९१६) यांचे त्यासंबंधीचे कार्य विशेष महत्त्वाचे ठरले. पहिला शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ म्हणून ⇨ एडवर्ड थॉर्नडाइक यांना जगभर मान्यता मिळाली. त्यांनी केलेले प्राण्यांच्या बुद्घिमत्तेवरील संशोधन व अनुबंधवादासंबंधीचे नवे सिद्धांत सर्वमान्य झाले.

विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत अध्ययन, शीण वा थकवा, अध्ययनवक इत्यादींसंबंधी बरेच संशोधन झाले. झां प्याजे, थॉर्नडाइक, वायगोटस्काई यांसारख्या संशोधकांच्या अभ्यासातून विकासात्मक

मानसशास्त्र, बालमानसशास्त्र यांचा परिचय झाला. दोन महायुद्धांच्या दरम्यान मनोविश्लेषण समष्टिवाद व मनोमापन या विषयांतील अभ्यासांनी शैक्षणिक मानसशास्त्र समृद्घ केले. दुसऱ्या महायुद्धानंतर अध्ययन- अध्यापनाविषयी विविध सिद्धांत व तत्त्वे पुढे आली. प्रायोगिक मानसशास्त्राच्या अचूक पद्धती, प्रदत्तांचे नेमके विश्लेषण, शास्त्रीय पद्धतीने केलेले निरीक्षण, यांतील प्रगतीमुळे शैक्षणिक मानसशास्त्र अधिक समृद्घ झाले. प्रगत देशांतील अनेक विदयापीठांतून व महाविदयालयांतून एक स्वतंत्र विषय म्हणून तसेच स्वतंत्र शैक्षणिक विभाग म्हणून शैक्षणिक मानसशास्त्रास स्थान लाभले. अशा विभागांमध्ये शैक्षणिक मानसशास्त्राच्या अंतर्गत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. तसेच संशोधनासाठी व उपयोजनासाठी बालमानसशास्त्र, शालेय मानसशास्त्र, मार्गदर्शन व उपयोजन, मनोमापन यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध असतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील अनेक विदयापीठांत वाचनासारख्या विषयावर अद्ययावत उपकरणांच्या आधारे सुसज्ज प्रयोगशाळेत विशेष संशोधन करण्यात येते. शिक्षक प्रशिक्षणातही शैक्षणिक मानसशास्त्राचा अंतर्भाव आहे.

साधारणपणे एकोणिसाव्या शतकापर्यंत या शास्त्रासंबंधी सैद्धांतिक व वर्णनात्मक पुस्तके प्रसिद्घ झाली. पुढे प्रगत संशोधनामुळे प्रत्यक्ष शास्त्रीय चाचण्या, त्यांचे निष्कर्ष, अध्ययनासंबंधीचे विविध बारकावे, यांवर भर देणारी पुस्तके निर्माण होऊ लागली. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत विदयार्थी हा केंद्रस्थानी मानून केलेला बालमानसशास्त्र व वाढत्या वयाच्या मुलांच्या मनोवृत्तींचा, विकासाचा, क्षमतांचा व अध्ययन पद्धतींचा अभ्यास यांवर भर देण्यात आला. प्राणिमानसशास्त्र, मनोविकृतिशास्त्र यांच्या साहाय्याने नव्या संकल्पना उपलब्ध झाल्या. बालकांमध्ये अंगभूत नकारात्मक वृत्ती असतात, असे पूर्वीचे सिद्धांत चुकीचे ठरले. तसेच आनुवंशिकता महत्त्वाची की परिस्थिती, यांवर खूपच चर्चा झाली. मानवी विकासात दोहोंची भूमिका महत्त्वाची आहे, असा निष्कर्ष मान्य झाला. शास्त्रशुद्घ विश्लेषणामुळे या दोन्ही घटकांच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक बाबी उजेडात येऊन त्यांच्यातील आंतरकियेची गुंतागुंत लक्षात आली. व्यक्तिविशिष्टता व व्यक्तिभेद यांना महत्त्व प्राप्त झाले. अध्ययनाच्या बाबतीत मनासारख्या कल्पित गोष्टी मागे पडून मेंदूचा विचार होऊ लागला. शरीर व मेंदूचे कार्य यांचा परस्परसंबंध व व्यक्तीचे वर्तन यांचा साकल्याने विचार होऊ लागला. अध्यापनही अध्यापक केंद्रित न राहता विदयार्थी केंद्रित बनले. पूर्वी अध्यापनासंबंधीचे सर्व निर्णय अध्यापक स्वतःच घेई पण आता विदयार्थ्यांची क्षमता, अभिक्षमता, कल, अध्ययनक्षमता, वय यांनुसार शिकवावे असा दृष्टिकोन प्रभावी ठरला. निदर्शित अध्ययनाची कल्पना अधिक मान्यता पावत आहे. अध्ययनासाठी पोषक उपयुक्त अशी वातावरणनिर्मिती करणे, तसेच अध्ययनाला साहाय्य करणे म्हणजे अध्यापन, अशी विचारसरणी आता रूढ झाली आहे. अध्यापकाचे व्यक्तिमत्त्व व अध्यापनाची कौशल्ये यांसंबंधी संशोधन होऊ लागले. जे. एम्. कॅटेल या मानसशास्त्रज्ञाने १९३१ मध्ये केलेल्या संशोधनातून अध्यापकाचे व्यक्तिमत्त्व व कार्य यांसंबंधी एक व्यापक विचार स्पष्ट झाला. अध्ययन-अध्यापनाबाबत विदयार्थ्यांची व शिक्षकांची सर्वेक्षणे करण्यात आली व त्यांतील निष्कर्ष मार्गदर्शक ठरले.

अध्ययनाच्या परिणामकारकतेचे मापन करण्यासाठीही संशोधन सुरू झाले. बुद्घिमापनाची संकल्पना पुढे आली, पण लवकरच तिच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. चारित्र्याची कल्पनाही व्यक्तिमत्त्वाच्या कल्पनेपेक्षा वेगळी असल्याचे दिसून आले. मूल्यशिक्षणाचा विचार पुढे आला. मनोविकृतीच्या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्वाचा विशेष विचार होऊ लागला. व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतील परिस्थितीचा घटकही अभ्यासनीय ठरला.


शैक्षणिक मानसशास्त्रातील सैद्धांतिक विकासही वेगाने होत राहिला. परंपरागत शिस्तीच्या संकल्पना व सिद्धांत बदलू लागले. थॉर्नडाइक यांनी उद्दीपक व प्रतिकिया यांच्यातील संबंध दृढ करणे, म्हणजेच अध्ययन असा सिद्धांत मांडला. बी. एफ्. स्कीनर यांनी अध्यापन म्हणजे वर्तन बदलण्यासाठी आवश्यक अशी उपाययोजना, असे मत मांडले (१९५७). त्यामुळे शिक्षणप्रकियेसंबंधीचे शास्त्र हे उपयोजित शास्त्र बनले. वेल्थी फिशर यांच्या मतानुसार शिक्षणाच्या मानसिक अंगांचा विचार करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. पुढे वर्तनवाद व समष्टिवाद यांचा शैक्षणिक मानसशास्त्रावर प्रभाव वाढला. गॅग्ने यांच्या मतानुसार (१९६७) अध्ययन विविध प्रकारांमध्ये घडते. त्यांचा परस्परसंबंध व त्यांचे परस्परावलंबन विशिष्ट प्रकारच्या उतरंडीतून स्पष्ट करता येते. १९५४ मध्ये ए. एच्. मॅस्लो यांनी तर १९६७ च्या सुमारास मक्लेलंड व अटकिन्सन यांनी प्रेरणा व यश यांच्यातील परस्परसंबंधाचे महत्त्व स्पष्ट केले. यशाची आशा, अपयशाची भीती, शिकण्याची इच्छा, निंदा-स्तुती इत्यादींचा अध्ययनावर होणारा परिणाम स्पष्ट झाला. अध्यापनाची सर्वसामान्य तत्त्वे अध्यापनाच्या विविध पद्धतींचे विश्लेषण, शिक्षकाची महत्त्वपूर्ण भूमिका, यांचा विशेष विचार होऊ लागला. अलीकडच्या काळात शिक्षकाच्या विशिष्ट वर्तनप्रकारांचा व अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अध्ययनावर कसा परिणाम होतो, याविषयी संशोधन होऊ लागले. तसेच अध्ययनविषयक प्रेरणेवर प्रभाव पाडणारे विविध घटक, अध्यापनपद्धतीमुळे अध्ययनात निर्माण होणारी गोडी, अध्यापनातील तंत्रज्ञान यांवर अधिक भर देण्यात आला. व्यक्तिभेदाच्या तत्त्वाबरोबरच व्यक्तिकेंद्रित विचारसरणी पुढे आली. शैक्षणिक व व्यावसायिक सल्ला व मार्गदर्शनाची अतिशय महत्त्वपूर्ण संकल्पना रूजली. बॅकमन व सेकॉर्ड (१९६८) यांनी सामाजिक संदर्भ व परिस्थितीबाबतची भूमिकाअग्रक्रमाने मांडली. बर्नस्टीन यांनी सामाजिक व सांस्कृतिक घटकांमध्ये कित्येक प्रेरणांचे मूळ असते हे दाखवून दिले. विदयार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कौटुंबिक वातावरणाचा घटक महत्त्वाचा असतो, हे अलीकडील संशोधनातून स्पष्ट झाले.

शैक्षणिक मानसशास्त्र ही विकसनशील शास्त्रशाखा आहे. म्हणून आज ती परिपूर्णावस्थेत आहे, असे नाही. तसेच या शास्त्रात सैद्धांतिक भूमिकांच्या संदर्भात वादाचे मुद्देही बरेच आहेत. तथापि मानसशास्त्राचे शैक्षणिक उपयोजन अत्यंत उपयुक्त आहे. हे उपयोजित शास्त्र असल्याने त्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवरील मूलभूत संशोधन मर्यादित झालेले आढळते. शैक्षणिक मानसशास्त्राच्या उपयुक्ततेबाबत तसेच उपयोजन होण्याबाबत समाजात अधिक जागृती होण्याची गरज आहे. भारतासारख्या देशात शैक्षणिक मानसशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना यशस्वी रीत्या राबवल्या जातात, हे पुरेसे नाही. विदयापीठातील शिक्षकांना शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास अनिवार्य नाही. त्याचप्रमाणे शैक्षणिक मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांत विदयार्थ्यांच्या जीवनातील अधिक उदाहरणे व सर्वेक्षणे अपेक्षित आहेत. केवळ सिद्धांतांचे संकलन उपयुक्त ठरत नाही, तर उपयोजनांचे प्रकार व प्रयोग यांवर भर देणे योग्य ठरेल.

संदर्भ : 1. Elliott, S. N. Kratochwill, T. R. Cook, J. L. Travers, J. K. Educational Psychology : Effective Teaching, Effective Learning, Boston, 2000.

2. Gage N. L. Berliner, D. C. Educational Psychology, Boston, 1984

सूक्ष्म अध्यापन कौशल्य (Micro Teaching Skill)

अध्यापनातील गुंतागुंत कमी करण्याकरिता नियंत्रित वातावरणात केलेला नियंत्रित अध्यापन सराव म्हणजे सूक्ष्म अध्यापन होय. या संकल्पनेत अध्यापनाचे सूक्ष्मीकरण अभिप्रेत असते. शिक्षणतज्ज्ञ टर्नी यांनी सांगितलेल्या तत्त्वानुसार यात अध्यापन आाशय, वेळ आणि विद्यार्थीसंख्या या सर्वांचेच सूक्ष्मीकरण करून एका वेळी एकाच अध्यापन कौशल्यावर केंद्रीकरण केले जाते.

अध्यापनकौशल्ये या संकल्पनेवर अनेक प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञांनी व्याख्या केल्या आहेत :

  • ब्राऊन, जी. ए. : ‘विद्यार्थ्यांच्या अध्ययनास चालना देण्याच्या हेतूने केलेल्या परस्परसंबंधी अध्यापन कृतींचा संच म्हणजे, अध्यापनकौशल्येʼ.
  • गेज, एन. एल. : ‘अध्यापक वर्गात वापरू शकतील अशा विशिष्ट कार्यपद्धती तंत्रे म्हणजे, अध्यापनाची तांत्रिककौशल्येʼ.
  • सिंह, एल. सी.; जोशी, ए. एन. : ‘कार्यगट साध्य करणारा व विद्यार्थ्यांबरोबरच्या आंतरक्रियात्मक परिस्थितीमध्ये अवबोधात्मक व बोधात्मक क्रियांचा परिपाक म्हणून अध्यापकाने प्रदर्शित केलेला शाब्दिक व अशाब्दिक कृतींचा संयुक्त संच म्हणजे, अध्यापनकौशल्येʼ.
  • पासी, बी. के. : ‘प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांच्या अध्यापनास चालना देण्यास उपयुक्त ठरणारा अध्यापन वर्तनांचा संच म्हणजे, अध्यापनकौशल्येʼ.

शिक्षणतज्ज्ञ ॲलन ड्वाईट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९६० मध्ये अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठात सूक्ष्म अध्यापन या तंत्राचा उदय व विकास केला. त्यानंतर भारतात आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक विद्यापीठे बी. एड.च्या व डी. एड.च्या अभ्यासक्रमात या तंत्राचा वापर करीत आहेत. सूक्ष्म अध्यापन हे शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे एक महत्त्वपूर्ण तंत्र आहे. त्यामुळे सूक्ष्म अध्यापन या तंत्राबरोबरच अध्यापनकौशल्ये ही नवी संकल्पना शिक्षक प्रशिक्षणात आली. अध्यापन अधिक विकसित, प्रगत व परिणामकारक होण्यासाठी सूक्ष्म अध्यापन प्रक्रिया उपयुक्त ठरते.

वर्ग अध्यापन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्या गुंतागुंतीचे दडपण शिक्षकांवर येऊ शकते; मात्र अध्यापनाचे सूक्ष्मीकरण केल्यामुळे ही गुंतागुंत कमी होते. त्यामध्ये सोपेपणा येऊन वर्गातील/शाळेतील शैक्षणिक परिस्थितींवर शिक्षकांचे नियंत्रण वाढते. नियंत्रित परिस्थितीत शिक्षक एखाद्या कृतीचा किंवा कृतीसंचाचा अधिक सहजगत्या सराव करू शकतो. त्याचबरोबर स्वत: सर्व कृती कशा कराव्यात, हे आत्मसात करू शकतो. या कृती किंवा कृतीसंचांनाच ‘अध्यापनकौशल्येʼ असे म्हणतात. सूक्ष्म अध्यापनाची परिस्थिती शिक्षकांना नवनवीन अध्यापनकौशल्ये साध्य करण्यासाठी किंवा जुनी कौशल्ये सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

वैशिष्टे : सूक्ष्म अध्यापनकौशल्य हे उत्तम अध्यापक तयार करण्याचे शास्त्रशुद्ध, सरस आणि उपयुक्त असे आधुनिक तंत्र असून त्याची वैशिष्टे पुढीलप्रमाणे :

  • अध्यापनकौशल्ये हे वर्तनाचा एक संच असतो.
  • सूक्ष्म अध्यापनकौशल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीत्या चालना मिळवून देण्यास अध्यापकाला साह्य होते.
  • सूक्ष्म अध्यापनकौशल्ये इतर वर्तनसंचाच्या समवेत अध्यापनात सहजगत्या वापरता येते.
  • प्रत्येक कौशल्याचे प्रशिक्षण विशिष्ट हेतू डोळ्यांसमोर ठेवून दिले जाते.
  • संकीर्णतेकडून सुलभतेकडे नेणारे हे तंत्र आहे.
  • यामध्ये अध्यापनाच्या सर्व कौशल्यांची माहिती होते.
  • एका वेळी एकाच अध्यापन कौशल्याचा सराव केला जातो.
  • अध्यापन परिणामकारक होऊन शिक्षक व विद्यार्थांत चिकित्सक दृष्टीकोन विकसित होतो.
  • या तंत्रात विद्यार्थिसंख्या मर्यादित असून पाठाचा कालावधी अल्प असतो . शिवाय अध्यापनकौशल्ये साधे असते.
  • या अध्यापनात प्रत्याभरणपद्धती असल्यामुळे त्यात स्वयं मूल्यमापन करता येते.
  • अध्यापनात गुंतागुंत कमी होऊन योग्य रितीने सराव होतो.

सूक्ष्म अध्यापनकौशल्यात सेवापूर्व प्रशिक्षण आणि सेवांतर्गत प्रशिक्षण असे दोन दृष्टिकोन आहेत. सेवापूर्व प्रशिक्षण : सेवापूर्व प्रशिक्षण म्हणजे प्रत्यक्ष सेवेला सुरुवात करण्यापूर्वी देण्यात येणारे प्रशिक्षण होय. सेवापूर्व प्रशिक्षणात अध्यापनास उपयुक्त सर्वसामान्य अशा सर्वच अध्यापन कौशल्यांचा विचार होतो.

सेवांतर्गत प्रशिक्षण : सेवांतर्गत प्रशिक्षण म्हणजे सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी दिले जाणारे प्रशिक्षण. सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी सूक्ष्म अध्यापनकौशल्यांचा नैदानिक दृष्टिकोन विचारात घेण्यात येतो. म्हणजेच शिक्षकाचे कोणत्या अध्यापनकौशल्यांवर प्रभुत्व आहे, ते पाहून उर्वरित कौशल्यांच्या प्रशिक्षणाचा यात विचार होतो.

सूक्ष्म अध्यापन पाठ : सूक्ष्म अध्यापन पाठ पुढील मुद्द्यांनुसार प्रभावी करावा :

  • सज्जता प्रवर्तन : पाठाची परिणामकारक सुरुवात करणे.
  • स्पष्टीकरण : विद्यार्थ्यांपर्यंत ठळक आवाजात व सुस्पष्टपणे माहिती पोहोचविणे.
  • मुक्त प्रश्न : विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देणे.
  • प्रबलन : विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन अध्ययनास चालना देणे.
  • उदाहरणांचा वापर : उदाहरणे व दाखले देऊन मुद्दा स्पष्ट करणे.
  • चेतक बदल : विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित करून घेणे.
  • फलकाचा अध्यापनातील उपयोग : फळ्याचा योग्य व परिणामकारक वापर करणे.
  • शैक्षणिक साधनांचा उपयोग : जास्तीत जास्त शैक्षणिक साधनांचा योग्य व परिणामकारक उपयोग करणे.
  • समारोप : पाठाचा परिणामकारक शेवट करणे.
  • वर्ग व्यवस्थापन : वर्गावर नियंत्रण ठेवणे.

पायऱ्या : सूक्ष्म अध्यापन विकसित करताना पुढील पायऱ्या असतात :

  • पाठ नियोजन : प्रशिक्षणार्थी आपल्या निरीक्षकाच्या साह्याने ५ ते ७ मिनिटांच्या पाठात असा आशय निवडावा की, ज्यामध्ये कौशल्यांचा जास्तीत जास्त सराव होईल.
  • कौशल्य प्रशिक्षण : प्राध्यापक हे शिक्षक-प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्याचे प्रशिक्षण देत असताना. त्यामागील मानसशास्त्रीय बैठक, कौशल्याचे प्रयोजन इत्यादी समजून देऊन तसे प्रात्यक्षिकही करून दाखवावेत.
  • पुन: अध्यापन सत्र : प्रशिक्षणार्थ्याने सुरुवातीच्या पाठात विविध साधनांचा वापर केला असला, तरी पाठ असमाधानकारक झाला असेल, तर त्याला पुन्हा त्याच पाठाचे अध्यापन करावे लागते. त्याचे निरीक्षक आणि विद्यार्थी दोघेही मूल्यमापन व चिकित्सा करतात. त्यानंतर परत त्याच पाठाचे अध्यापन दुसऱ्या विद्यार्थ्यांसमोर केले जाते; मात्र या वेळी वेळेचे बंधन नसते.
  • प्रत्याभरण व चिकित्सा सत्र : प्रशिक्षणार्थ्याचा पाठ प्रभावी झाला नसल्यास त्याला त्याच्या अध्यापनातील दोष, मर्यादा, उणिवा दाखविल्या जातात. पाठात कोणत्या ठिकाणी सुधारणा करणे गरजेचे आहे, ते सांगून त्याला पुन्हा प्रत्याभरणाची संधी दिली जाते. आवश्यकतेनुसार आदर्श अध्यापन पाठाची चित्रफीत दाखविली जाते.

मार्गदर्शन तत्त्वे :

  • तात्विक माहिती : यात विशिष्ट कौशल्याचे महत्त्व, वर्ग अध्यापनातील त्याचे नेमके स्थान, त्यात समाविष्ट असलेल्या योग्य अथवा अयोग्य घटकांचे स्पष्टीकरण व उदाहरणे यांची माहिती असते.
  • नमुना सादरीकरण : तज्ज्ञ प्रशिक्षक ज्या वेळी प्रत्यक्ष एखाद्या कौशल्याचा पाठ सादर करतात, त्या वेळी संबंधित कौशल्यातील योग्य घटकांचा अधिकतम वापर व अयोग्य घटकांचा त्याग यांवर त्यांचा कटाक्ष असतो. कोणता घटक केंव्हा, कोठे व कसा आला, तसेच संपूर्ण पाठात तो घटक किती वेळा आला, या चर्चेसाठी निरीक्षण श्रेणीच्या आधारे निरीक्षण करण्यात येते.
  • नियोजन : सूक्ष्मपाठ नियोजनात कौशल्याचा अधिकतम वापर या तत्त्वाला प्राधान्य असते. ५ ते ७ मिनिट कालावधीचा सदर पाठ असतो. आशयाला येथे गौण स्थान असते; मात्र सर्व योग्य घटक अधिकतम स्वरूपात पाठात येणे महत्त्वाचे असते. नियोजन करतांना शिक्षककृती, विद्यार्थीकृती आणि कौशल्यघटक या तीन स्तंभात त्याचे लेखन असते.
  • अध्यापन : दहा शिक्षक-प्रशिक्षणार्थ्यांच्या गटात अभिरूप परिस्थितीत सूक्ष्म पाठाचे अध्यापन चालते. त्यात दोन शिक्षक-प्रशिक्षणार्थी, पाठ निरीक्षक, एक वेळ पाहणारा, एक पाठ घेणारा आणि उर्वरित शिक्षक-प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची भूमिका बजावतात.
  • प्रत्याभरण : प्रत्येक पाठानंतर निरीक्षण श्रेणीतून प्राप्त माहितीनुसार प्रत्याभरण होत असते. त्यात प्रथम: सर्व निरीक्षणांची फळ्यावर नोंद; निरीक्षण भिन्नतेवर प्रथम चर्चा; अपेक्षित घटक त्याची वारंवारीता याकडे लक्ष वेधणे; कोणता घटक केंव्हा, कोठे, कसा आला याची चर्चा; न आलेल्या घटकांची पाठात येण्याच्या दृष्टिने चर्चा; त्यासाठी आवश्यक तेथे दिग्दर्शन, प्रत्याभरणानुसार पाठात दुरुस्ती इत्यादी बाबी महत्त्वाच्या असतात.

सूक्ष्म अध्यापनपद्धती ही अध्यापनकौशल्याचे प्रशिक्षण देते. या प्रशिक्षणामागे विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि वर्गाला निदेशन करणे ही तत्त्वे गृहीत धरण्यात येतात. तसेत प्रत्याभासाला अथवा अभिरूपाला किती महत्त्व आहे, हे दिसून येते.

निरिक्षकाचे कार्य :

  • सूक्ष्म अध्यापनात निरीक्षकाची भूमिका बारकाईने आणि वस्तूनिष्ठ दृष्टिकोनातून निरीक्षण करण्याची असते.
  • प्रशिक्षणार्थ्यांने पाठ कसा घ्यावा, याचे तो मार्गदर्शन करतो आणि पाठ संपल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांने कसा पाठ घेतला ते सांगतो.
  • पाठ यशस्वी करण्याकरिता निरीक्षकाने प्रशिक्षणार्थ्यांशी चर्चा, विचारविनिमय करावा.
  • शाळेमध्ये जाऊन प्रशिक्षणार्थ्यांची भेट घेऊन सूक्ष्म अध्यापन पाठाचे नियोजन करण्यास, पाठाची अनुसूची करण्यास साह्य करावे.
  • निरीक्षकाने पाठाचे मूल्यांकन करून प्रत्याभरण करावे.
  • प्रशिक्षणार्थ्यांचे कौशल्य संपादन क्षमता वाढविण्याचा निरीक्षकाने सदैव प्रयत्न करावा.

कार्यपद्धती : सूक्ष्म अध्यापनात प्रथमत: विशिष्ट कौशल्याची तात्विक माहिती स्पष्ट केली जाते. त्यानंतर तज्ज्ञांद्वारा संबंधित कौशल्याचे सादरीकरण व चर्चा केली जाते. पुढे विद्यार्थ्यांना एक सूक्ष्म पाठ टाचण काढून प्रत्यक्ष पाठाचे सादरीकरण करण्यास सांगण्यात येते. प्रत्येक पाठावर प्रत्याभरण देऊन पुन्हा पाठ नियोजन, पुन्हा अध्यापन व चर्चा अशा कृती केल्या जातात. त्याला सूक्ष्म अध्यापन चक्र असेही म्हणतात.

 

 

सूक्ष्म अध्यापनकौशल्ये निरीक्षण तक्त्यामध्ये प्रत्येक कौशल्याच्या चिकीत्सक मुद्द्यांचा विचार करून अपेक्षित व त्याज्य घटकांची यादी करण्यात येते. त्यापुढे १० ते १२ उभे स्तंभ आखून मूल्यमापन श्रेणी तयार केली जाते. पाच मिनिटांसाठी १० स्तंभ, सात मिनिटांसाठी १४ स्तंभ दिले जातात. अध्यापन व पुनरअध्यापनासाठी एकाच प्रकारची श्रेणी वापरली जाते. प्रत्येक स्तंभ वेळेचा निदेशक असतो. एक स्तंभ अर्ध सेकंद कालावधीसाठी असतो. शेवटी एकूण असा एक स्तंभ असतो, ज्यात ते विशिष्ट वर्तन त्या ५ ते ७ मिनिटांत किती वेळा घडले ते स्पष्ट करता येते. श्रेणीच्या शेवटी गुणात्मक शेरे देण्यासाठी ही जागा दिलेली असते.

मर्यादा : सूक्ष्म अध्यापनपद्धती ही  अध्यापनकौशल्य आणि अध्यापन गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण असून त्याच्या काही मर्यादा पुढीलप्रमाणे :

  • सूक्ष्म पाठाचे टाचण काढताना मर्यादित विषय घटकावरच पाठ घ्यावा लागत असल्यामुळे इतर विषय घटकांचे आकलन होत नाही.
  • सूक्ष्म अध्यापनपद्धती अतिशय यांत्रिक स्वरूपाची आहे.
  • सूक्ष्म अध्यापन या पाठात मर्यादीत (५ ते ७) विद्यार्थी संख्या असल्यामुळे शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर वर्गात सुमारे ५० विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शिकविताना निर्माण होणाऱ्या समस्या आणि व्यवस्थापन यांसंबंधी कल्पना येणार नाही.
  • अध्यापन करणे ही सलग कृती असल्यामुळे त्यातील कौशल्ये अलग करून पाठ घेणे ही कृत्रिमता आहे.
  • प्रत्येक कौशल्याचा वापर केव्हा व कोठे करायचा, याचे प्रमाणक ठरले नाहीत.

शैक्षणिक मूल्यमापन (Educational Evaluation)

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात आत्मसात केली आहेत, हे शोधून काढण्याची एक पद्घतशीर प्रक्रिया. मूल्यमापन म्हणजे केवळ निरीक्षण नव्हे, तर एक वस्तुनिष्ठ पद्घतशीर प्रक्रिया आहे. ज्या शैक्षणिक कार्यक्रमाचे मूल्यमापन करावयाचे असते, त्या कार्यक्रमाची काही उद्दिष्टे अगोदर ठरविलेली असतात. मूल्यमापन ही एक सर्वसमावेशक स्वरूपाची प्रक्रिया असून तीत विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये घडलेला मापनीय बदल व त्याचा अन्वय या दोन्ही गोष्टी समाविष्ट होतात.

मूल्यमापनाचे विविध उपयोग : शैक्षणिक मूल्यमापनाचे पुष्कळ उपयोग ज्ञात आहेत. त्यांतील काही पुढीलप्रमाणे :

  • विद्यार्थ्यांची प्रगती कोणत्या टप्प्यापर्यंत झाली आहे, हे कळण्यास मूल्यमापन उपयोगी पडते. त्यामुळे विद्यार्थी योग्य दिशेने प्रगती करत आहे किंवा नाही, याचा मागोवा घेणे शिक्षकांना शक्य होते. ठरविलेल्या उद्दिष्टांच्या दिशेने विद्यार्थ्यांची प्रगती होत नसेल, तर वेळीच काही उपाययोजना करणे शिक्षकांना शक्य असते.
  • जर मूल्यमापन योग्य तऱ्हेने आयोजित करून कार्यवाही केली, तर विद्यार्थ्यांना त्यापासून प्रेरणा मिळते. आपण ज्या हेतूने प्रयत्न करीत आहोत, त्यात यश मिळत आहे, असे दिसल्यानंतर साहजिकच विद्यार्थ्यांना अधिक प्रयत्न करण्यास उत्साह वाटतो.
  • शिक्षकांची अध्यापनातील कार्यक्षमता तपासण्याच्या दृष्टीने मूल्यमापन उपयुक्त असते. वर्गामध्ये जी अध्ययन-अध्यापन क्रिया चालू असते, जी विविध साधने वापरली जातात, ज्या तऱ्हेने शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रिया चालू असते, त्या सर्व गोष्टी योग्य तऱ्हेने चालू आहेत किंवा नाहीत याचेही मूल्यमापन करता येते.
  • शाळा-महाविद्यालये चालविणाऱ्यांना अधूनमधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल पालकांकडे काही खुलासा करावा लागतो. विद्यार्थ्यांची प्रगती नेमकी कोणत्या पातळीपर्यंत झाली आहे, हे पालकांना कळण्यासही मूल्यमापनाचा उपयोग होतो.
  • सर्वसमावेशक स्वरूपाचे मूल्यमापन शालेय व्यवस्थापनातही उपयुक्त ठरते. शाळेने जे उद्दिष्ट ठरविलेले असते, ते साध्य झाले आहे किंवा नाही, अभ्यासक्रमाची बळकट बाजू कोणती व त्यातील कमकुवत बाजू कोणती इत्यादी बाबी कळणे मुख्याध्यापकांनाही शक्य होते. तसेच शाळेमध्ये जे विविध कार्यक्रम होतात, त्यांचीही परिणामकारकता मुख्याध्यापकांच्या ध्यानी येऊ शकते.

मूल्यमापनाची सर्वसाधारण तत्त्वे : मूल्यमापन म्हणजे केवळ वेगवेगळी साधने तयार करून त्यांच्या साहाय्याने मिळविलेले वृत्त नव्हे. ती एक प्रक्रिया असून उद्योगधंद्यांमध्ये ज्या हेतूने विचार करतात, तसाच विचार शिक्षणामध्येही करणे आवश्यक मानले जाते. उदा., या व्यवहारामध्ये कोणती गुंतवणूक करण्यात आलेली आहे, या व्यवहारातील प्रकियेचे स्वरूप काय आहे, तसेच या प्रकियेचे फलित कोणते आहे अशा हेतूने विचार करणे शिक्षणामध्येही आवश्यक असते. गुंतवणूक-प्रक्रिया-फलित या पद्धतीने मूल्यमापनाची काही सर्वसाधारण तत्त्वे पुढीलप्रमाणे सांगता येतील :

  • आपण मूल्यमापन कशासाठी करतो आहोत, हे नक्की ठरल्याखेरीज मूल्यमापनाची साधने तयार करू नयेत किंवा वापरू नयेत.
  • वेगवेगळी उद्दिष्टे तपासण्यासाठी वेगवेगळी मूल्यमापनसाधने वापरावी लागतात. उदा., रसायनशास्त्रातील ज्ञानाची प्रगती तपासत असताना केवळ लेखी परीक्षा पुरेशी ठरणार नाही. त्यासाठी प्रयोगपरीक्षेचाही अवलंब करावा लागेल. एम. फिल., पीएच. डी. यांसारख्या परीक्षांमध्ये लेखी परीक्षेबरोबर तोंडी परीक्षा, स्वतंत्रपणे प्रबंध लिहिण्याची परीक्षा अशा अनेक गोष्टी सामावलेल्या असतात. उद्दिष्टांशी सुसंगत अशीच मूल्यमापनसाधने निवडावी लागतात.
  • सर्वसमावेशक मूल्यमापनासाठी एकाच मूल्यमापनसाधनाचा उपयोग करून चालत नाही. विद्यार्थ्यांची जी विविधांगी प्रगती झालेली असते, तिचे सम्यक चित्र हवे असल्यास विविध मूल्यमापन तंत्रांचा उपयोग करावा लागतो.
  • प्रत्येक मूल्यमापनसाधनाचे काही एक वैशिष्ट्य असते, तसेच त्याची काही मर्यादाही असते. त्यामुळे एखादे साधन किंवा तंत्र वापरताना त्याच्या या दोन्ही बाजू लक्षात घेणे इष्ट ठरते. लेखी परीक्षेचा वापर केला असता त्यातून कारक-कौशल्ये तपासली जाणार नाहीत, हे उघडच आहे. तसेच प्रयोगशाळेतील प्रयोगातून विद्यार्थ्याने योग्य अभिवृत्ती धारण केली की नाही, ते कळेलच असे नाही.
  • अलीकडच्या काळात संपूर्ण शैक्षणिक प्रक्रिया परीक्षार्थी झाली आहे, असे वाटते. प्रत्येक गोष्ट ही परीक्षेतील यशाकरिता व त्यामुळे मिळणाऱ्या प्रतिष्ठेकरिता चाललेली आहे, असे दिसते. मूल्यमापनाचा हा विपरीत परिणाम म्हटला पाहिजे. मूल्यमापन हे साध्य नव्हे, ते साधन आहे.
  • मूल्यमापनाकरिता वेगवेगळ्या साधनांप्रमाणेच वेगवेगळ्या पद्धतीही वापरता येतात. उदा., चाचण्या घेणे, स्वयंअहवाल-तंत्रे आणि निरीक्षणतंत्रे वापरणे इत्यादी. मूल्यमापनासाठी साधनांचे प्रकार आणि ती वापरावयाची तंत्रे या दोहोंचाही साकल्याने विचार करावा लागतो.

शैक्षणिक मूल्यमापनाचे काही पैलू : शैक्षणिक मूल्यमापनाच्या संदर्भातील काही मूलभूत मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्टपणे व्याख्यात केल्याशिवाय शैक्षणिक मूल्यमापनाचा विचारच होऊ शकत नाही.
  • शैक्षणिक कार्यक्रमाची उद्दिष्टे ठरल्यानंतर अध्ययन-अध्यापन प्रक्रिया त्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे किंवा नाही याचा विचार करावा लागतो. रसायनशास्त्रात खनिज लोखंडापासून शुद्घ पोलाद कसे तयार करतात, अशा प्रकारचा धडा असला, तर या लोखंडाचे किंवा पोलादाचे रासायनिक रूप माहीत असणे, त्यांमध्ये कोणती रसायने वापरली जातात, कोणत्या प्रक्रिया केल्या जातात, किती उष्णता लागते इत्यादी गोष्टींची सांगोपांग चर्चा नसेल, तर खनिज लोखंडापासून शुद्घ पोलाद कसे तयार करतात, हे विद्यार्थ्यांना कधीच यथार्थपणे समजू शकणार नाही. प्रौढ-शिक्षणाच्या अनौपचारिक कार्यक्रमात जाणीवजागृती आणि कार्यात्मकता ही उद्दिष्टे मानलेली आहेत. प्रत्यक्षात मात्र अनेकदा प्रौढशिक्षण वर्गात केवळ साक्षरतेचे तास होतात. त्यामुळे जाणीवजागृती आणि कार्यात्मकता यांच्या संदर्भात प्रौढशिक्षणाचे मूल्यमापन कसे करता येईल? थोडक्यात वर्गातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया उद्दिष्टांशी सुसंवादी असली पाहिजे.
  • वर्गामध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रिया चालू असता, विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये कोणता बदल अपेक्षित आहे, याची जाणीव शिक्षकांना असली पाहिजे. तसेच हा बदल शिक्षणाच्या उद्दिष्टांशी संबंधित आहे किंवा नाही, याचाही मागोवा घेतला पाहिजे. पुष्कळ वेळा असे घडते की, विद्यार्थ्यांच्या वर्तनातील अपेक्षित बदलाचा विचार करीत असताना मूळ उद्दिष्टांचा मागमूसही शिल्लक राहात नाही. म्हणूनच एखाद्या शैक्षणिक कार्यक्रमाची उद्दिष्टे निश्चित झाल्यानंतर त्यांच्याशी सुसंगत अशी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनातील अपेक्षित बदल यांची शिक्षकांना योग्य कल्पना असली पाहिजे.
  • एकदा कोणता बदल अपेक्षित आहे, हे नक्की ठरल्यानंतर हे बदल कसे मोजायचे, याबद्दलची साधने किंवा तंत्रे ठरविता येतात. सामान्यत: ज्ञान, कौशल्ये आणि वृत्ती अशा प्रकारची उद्दिष्टे असतात. या उद्दिष्टांशी सुसंगत ठरणारे वर्तनबदल वेगवेगळे असतात. उदा., सामाजिक समता याविषयी माहिती मिळाली, समतेचे कार्यक्रम कसे आयोजित करावे हे कळले, समतेबद्दल एक उदार दृष्टिकोण तयार झाला की, या तिनही वर्तनबदलांसाठी वेगवेगळ्या मूल्यमापन साधनांची उपाययोजना करणे आवश्यक असते.

शैक्षणिक मूल्यमापनाची साधने व तंत्रे : शैक्षणिक मूल्यमापनात विविध साधनांचा व तंत्रांचा उपयोग केला जातो. विद्यार्थ्यांचे वय, शैक्षणिक पातळी, उद्दिष्टाचे स्वरूप इत्यादींवर साधनांची वा तंत्रांची निवड अवलंबून असते. विविध प्रकारच्या कसोट्या (शिक्षक-रचित, प्रमाणित निष्पादन कसोट्या, बुद्धिमापन कसोट्या, निदानात्मक कसोट्या), पडताळासूची, शोधिका, पदनिश्चयन श्रेणी, मुलाखत अनुसूची, प्रश्नावली, संचयी नोंद, घटनाभिलेख, प्रक्षेपण कसोट्या, ज्ञानरचनावादी साहित्य इत्यादी मूल्यमापनाची साधने होत. लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, मुलाखत, निरीक्षण, प्रकल्पपद्धती, समाजमिती इत्यादी मूल्यमापनाची तंत्रे होत. आधुनिक काळात मूल्यमापनासाठी विविध तंत्रे व साधने वापरतात. त्यामुळे मूल्यमापन अधिक विश्वसनीय होते; मात्र कोणत्याही साधनाकरिता किंवा कसोटीकरिता यथार्थता, विश्वसनीयता, योग्यता, सुसाध्यता, भेदनशक्ती आणि प्रमाणीकरण हे गुण आवश्यक ठरतात.

अध्यापक – प्रशिक्षण

अध्यापक-प्रशिक्षण : शिक्षण हे व्यक्तिविकास साधण्याचे एक प्रमुख साधन मानले जाते. साहजिकच हे कार्य ज्यांच्या हाती असते, त्यांना ह्या कार्याची दिशा माहीत असणे आवश्यक आहे.

शिक्षणाची उद्दिष्टे व मूल्ये, शिक्षणप्रक्रियेचा अर्थ, अध्यापनाचे तंत्र, वर्तनव्यवस्थापनाचे तंत्र बालमनाची ओळख, लोकशाहीप्रधान समाजरचनेच्या विशिष्ट गरजा, शिक्षण व राष्ट्रविकास यांचा संबंध इ. गोष्टींचे ज्ञान त्यांना असणे आवश्यक आहे. विशिष्ट विषयाचे अध्यापन करणे एवढेच मर्यादित कार्य आज शिक्षकाचे राहिले नसून बालकाच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास, चारित्र्यसंवर्धन, नागरिकत्वाचे शिक्षण इ. व्यापक उद्दिष्टे समोर ठेवून शिक्षकाने कार्य करावे ही आजच्या काळाजी गरज आहे. शैक्षणिक मूल्ये, अभ्यासक्रम, अध्यापनपद्धती, शैक्षणिक साधने, मूल्यमापनपद्धती ही शिक्षणप्रणालीची विविध अंगे शिक्षकांना ज्ञात असणे आवश्यक आहे. शिक्षणप्रक्रियेत बालकाप्रमाणे अध्यापक हाही एक प्रमुख घटक आहे. शिक्षणव्यवस्थेचा तो कणाच मानला जातो. शिक्षणव्यवस्थेत भौतिक साधनसामग्री, अभ्यासक्रम इ. सर्व घटकांपेक्षा शिक्षकाचे महत्त्व अधिक आहे. शैक्षणिक मूल्ये साकार होण्यासाठी, अध्यापनकार्य प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी व शिक्षणाची एकूण गुणवत्ता वाढवण्यासाठी अध्यापक योग्य त्या संस्कारांनी युक्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याच्या प्रशिक्षणावर आज सर्व देशांत भर दिला जात आहे.

अध्यापकांना प्रशिक्षण दिले पाहिजे या गोष्टीची जाणीव यूरोपमध्ये मार्टिन ल्यूथर याला झाली होती. पुढेपेस्टालोत्सी व हेर्बार्ट या शिक्षणतज्ञांच्या देखरेखीखली जर्मनी, स्वित्झर्लंड देशांत प्रशिक्षणाचे काही वर्ग सुरू झाले व अध्यापनशास्त्राला प्रतिष्ठा मिळाली. अलीकडच्या काळात प्रथम खाजगी प्रयत्नाने १८२३ मध्ये सॅम्युएल हॉल याने अमेरिकेत अध्यापन विद्यालय सुरू केले आणि १८३९ मध्ये सरकारी ‘नॉर्मल स्कूल’ची स्थापना झाली. इंग्लंडमध्ये १८४६ मध्ये पहिले सरकारी नॉर्मल स्कूल स्थापन झाले. या दोन्ही देशांत ही नॉर्मल स्कूल्स प्राथमिक शाळांच्या शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठीच होती. शिक्षकांचे विषयज्ञान व अध्यापनकौशल्य वाढविणे यांवरच त्यांत भर होता. व्यावसायिक ज्ञानाच्या अभ्यासक्रमाचा समावेश फार उशिरा झाला.

शिक्षणाच्या वाढत्या प्रसाराबरोबर माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली व शिक्षकांची टंचाई भासू लागली. त्याचबरोबर या शिक्षकांच्या प्रशिक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला. शिक्षणशास्त्रातील पदवी देणारी महाविद्यालये पाश्चात्य देशांत स्थापन झाली. हलकेहलके विद्यापीठांनीही शिक्षणशास्त्र-विभाग सुरू करून या कार्याच्या प्रगतीला हातभार लावला.

बहुतेक प्रगत देशांत माध्यमिक शिक्षणानंतर तीन ते चार वर्षांचा प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम असतो. माध्यमिक शाळेत काम करण्यासाठी आणखी एक वर्षाचा अभ्यासक्रम पार पाडावा लागतो. शिक्षक-प्रशिक्षकांसाठी संशोधनावर भर असलेला उच्च अभ्यासक्रम अमेरिकेत आहे. पहिली पदवी घेतल्यानंतर पुन्हा पाच वर्षांनी शिक्षकांच्या प्रगतीचे मूल्यमापन करून कायम स्वरूपाचे प्रमाणपत्र देण्याची योजना अमेरिकेत आहे.

भारतात अध्यापकांच्या प्रशिक्षण-कार्यास अलीकडच्या काळातच आरंभ झाला. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी डॅनिश मिशनऱ्यानी अध्यापकांच्या प्रशिक्षणाचे कार्य सुरू केले. त्यानंतर मुंबईच्या ‘नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’नेही हे कार्य हाती घेतले . मद्रास आणि कलकत्ता येथेही अध्यापकांच्या प्रशिक्षण-संस्था काढण्यात आल्या. १८५४च्या वुडच्या अहवालात अध्यापकांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात आला. १८८१-८२च्या सुमारास नॉर्मल स्कूल्सची संख्या १०६वर गेली. या सर्व प्रशिक्षणसंस्था प्राथमिक शिक्षकांना देण्याचे कार्य करीत होत्या. प्राथमिक शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करून अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रवेश देण्यात येई व त्यांचे व्यावसायिक ज्ञान वाढविण्यापेक्षा त्यांचे शालेय विषयांचे ज्ञान वाढविण्यावरच भर दिला जाई. मेरी कार्पेंटर या ब्रिटिश विदुषीच्या प्रयत्नाने त्या काळी भारतात शिक्षकांसाठीही प्रशिक्षणसंस्था सुरू झाल्या. १८८२च्या सुमारास अशा १५ संस्था अस्तित्वात होत्या. अशिक्षित स्त्रियांनाही या संस्थांत प्रवेश देऊन त्यांच्या शिक्षणाची व प्रशिक्षणाची सोय करण्यात येई.

भारतात १८८२ पर्यंत माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या मद्रास व लाहोर येथे अशा दोनच संस्था होत्या. त्यांत पदवीधरांबरोबर पदवी नसलेल्या शिक्षकांनाही प्रवेश दिला जाई. अभ्यासक्रमात व्यावसायिक विषयांपेक्षा शालेय विषयांच्या अध्यापनावरच भर असे. १८८२ मध्ये भारतीय शिक्षण-आयोगाने पदवीपूर्व व पदवीधर अध्यापकांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असण्याची आवश्यकता प्रतिपादली व शैक्षणिक तत्त्वे व अध्यापन या विषयांची परीक्षा सुरू करावी अशी शिफारस केली. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी भारतात सहा महाविद्यालये होती. त्या वेळच्या मुंबई इलाख्यात माध्यमिक शिक्षकांसाठी पहिले प्रशिक्षण-महाविद्यालय सरकारतर्फे १९०६ मध्ये मुंबई येथे सुरू करण्यात आले. १९०४च्या भारत सरकारच्या ठरावानुसार पदवीधर शिक्षकांसाठी एक वर्षाचा व्यावसायिक शिक्षणाचा व पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा सामान्य व व्यावसायिक शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू झाला. त्याशिवाय प्रशिक्षणसंस्थांना जोडूनच आदर्श शाळा व प्रयोगशाळा सुरू झाल्या. १९१९च्या कलकत्ता विद्यापीठ-आयोगाने प्रशिक्षणविषयक एकूण कार्यक्रमात संशोधनकार्याचा अंतर्भाव करून विद्यापीठात शिक्षणशास्त्रविभाग निर्माण करण्यात भर दिला.

१९२९च्या हारटॉख समितीने इतर काही गोष्टींबरोबरच वारंवार उजळणीवर्ग व शिक्षकसंमेलने भरवून व्यवसायांतर्गत प्रशिक्षणाची खास सोय करण्याची सूचना केली. अशा प्रकारचे कार्य करण्यासाठी विस्तारसेवाविभाग भारतातील शंभर प्रशिक्षणमहाविद्यालयांत गेल्या दहा वर्षांत सुरू करण्यात आले आहेत.

अध्यापक-प्रशिक्षणातील समस्या : अध्यापक-प्रशिक्षणाबाबतच्या समस्यांचे स्वरूप सर्वच देशांत कमीअधिक प्रमाणात सारखेच आहे. भारतीय शिक्षण-आयोगाने (१९६४-१९६६) या बाबतीत बराच ऊहापोह केला असून काही उपायही सुचविले आहेत. या समस्यांचे स्वरूप थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे : (१) शिक्षक-व्यवसायात प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या पात्रतेचा दर्जा उंचावणे व प्रशिक्षणाचा कालावधी वाढविणे. (२) शिक्षकांच्या शालेय विषयांच्या ज्ञानाचा कस उंचावणे. (३) विविध स्तरांवरील प्रशिक्षण एकमेकांच्या जवळ आणणे व त्यात एकसूत्रीपणा निर्माण करणे. (४) प्रशिक्षणाचे कार्य विद्यापीठीय कार्याचा आवश्यक भाग बनविणे. (५) प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे. विशेषत: अभ्यासक्रम-संशोधन, कृतिशील संशोधन, अध्यापनसाहित्याची निर्मिती या बाबतींत शिक्षकांची क्षमता वाढविणे. (६) शिक्षक-प्रशिक्षणाचा दर्जा सतत वाढता ठेवणे. (७) शाळा व अध्यापनविद्यालये यांना जवळ आणणे.

भारतीय संविधनाप्रमाणे शिक्षण हा जरी घटकाराज्यांच्या अधिकारातील विषय असला, तरी केंद्रीय शासन शिक्षणाच्या विकासासाठी सामान्यत: जबाबदार असल्याने प्रयोग व प्रशिक्षण यांसंबंधीचे उपक्रम केंद्राने हाती घेतलेले आहेत.


राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण-केंद्र १९६१ मध्ये स्थापन झाले. या केंद्राद्वारा (१) शिक्षणाच्या सर्वच शाखांतील संशोधन-प्रयोगांना साह्य व मार्गदर्शन केले जाते. (२) प्रगत अभ्यासाचे वर्ग प्रशिक्षित शिक्षकांसाठी व शिक्षक-प्रशिक्षकांसाठी चालविले जातात. (३) सुधारित अध्यापन-तंत्रांसंबंधी साहित्याचा प्रसार करण्यात येतो. (४) विस्तार सेवाकेंद्राचे आयोजन केले जाते. या केंद्राच्या ज्या बारा शाखा आहेत, त्यांत शिक्षण-प्रशिक्षणाचा स्वतंत्र विभाग आहे. याच विभागाच्या देखरेखीखीली भोपाळ, म्हैसूर, भुवनेश्वर व अजमीर या ठिकाणी प्रादेशिक अध्यापन महाविद्यालये प्रयोगासाठी उघडली आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे मुंबई व हैदराबाद येथे इंग्रजीच्या अध्यापकांच्या प्रशिक्षणाची सोय केली आहे. तसेच शालेय विषयांचे पाठ्यक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम यांचा संयुक्त अभ्यासक्रम असलेली दोन केंद्रे कुरुक्षेत्र (हरियाना) व गारगोटी (महाराष्ट्र) येथे चालविलेली आहेत. ग्वाल्हेर येथे शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांस प्रशिक्षण देणारे महाविद्यालय चालविले आहे.

विद्यापीठ अनुदान-मंडळातर्फे  पदव्युत्तर प्रशिक्षणशास्त्राच्या व्यवस्थेची पाहणी करण्यात आली असून विविध विद्यापीठांतील अभ्यासक्रम, शिक्षक-प्रशिक्षकांचा दर्जा इ. मध्ये एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न होत आहे. अखिल भारतीय शिक्षक-प्रशिक्षकांच्या संघटनेमार्फतही प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, प्रयोग यांबाबत चर्चाविनयम चालू असतो.

महाराष्ट्रातील अध्यापक-प्रशिक्षण : राज्य-शासनाने अलीकडेच एक शिक्षक-प्रशिक्षक-मंडळ निर्माण केले असून त्यामार्फत सर्व स्तरांवरील शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे नियोजन होते. या मंडळाने प्राथमिक शिक्षणाचे प्रशिक्षण सुधारण्यासाठी पुढील उपाय योजले आहेत. प्रवेशासाठी माध्यामिक शालांत परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक केले आहे. पदविकाअभ्यासक्रम दोन वर्षांचा केला असून त्यात व्यावासिक विषयांचा अंतर्भाव केला आहे. वसतिगृहनिवास व कार्यानुभव आवश्यक गणले आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचे उपक्रमही याच मंडळामार्फत चालतात. माध्यमिक शिक्षकांच्या सुधारणा करण्याची योजना मंडळाच्या विचाराधीन आहे.

माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षक मुख्यत: विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विद्यालयांतून होते. त्यास पूरक कार्य शासनाचे मुंबईतील शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन-केंद्र करते. मार्गदर्शन, दृक्श्राव्यशिक्षण, हस्तव्यवसाय इ. विषयांसाठी प्रशिक्षणाचे अल्पकालीन वर्ग या केंद्रामार्फत चालतात. शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाची सोय कांदिवली येथील शासकीय विद्यालयात आहे. पूर्वप्राथमिक शिक्षक, चित्रकला-शिक्षक, हिंदी-शिक्षक यांच्या प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम शासनाने तयार केले असून त्यानुसार परीक्षा शासनाकडून घेतल्या जातात. प्रशिक्षणाचे कार्य सरकारमान्य खासगी संस्थांमार्फत होते [→अध्यापन व अध्यापनपद्धती].

संदर्भ : 1. Government of Bombay, A Review of Education in Bombay state (1855-1955), Poona, 1958.

           2. Ministry of Education, Govt. of India, Report of the Education Commission 1964-66, New Delhi, 1966.

           3. Mukerji, S.N. Education in India-Today and Tomorrow, Baroda, 1961.

           ४. अकोलकर, ग. वि. माध्यमिक शिक्षण, पुणे, १९६५.

चिपळूणकर, वि. वि.

अध्यापन व अध्यापन पद्धति

अध्यापन व अध्यापन पद्धति : अध्यापनाची व्याख्या, स्वरूप, अध्यापकाचे कार्य इ. विषयींच्या कल्पना प्राचीन काळापासून सतत बदलत आल्या आहेत. अध्यापन हा शब्द प्रयोजक आहे. ‘शिकावयास प्रेरणा देणे’ हा त्याचा अर्थ होय. आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टीनेही प्रेरणा व मार्गदर्शन हेच अध्यापनाचे सारसर्वस्व होय. अध्यापन करणारा शिक्षक व शिकणारा विद्यार्थी यांना जोडणारी, अध्ययन हे फल असलेली आणि निवेदन, विवरण, चर्चा, मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असलेली कृती म्हणजे अध्यापन. त्यात उद्दिष्टे, अभ्यासक्रम, अध्ययनप्रसंगांची योजना, अध्यापन पद्धती आणि उद्दिष्टांच्या सफलतेचे मूल्यमापन या पाचही गोष्टींचा समावेश होते. संपूर्ण अध्यापन-प्रक्रियेचा अध्यापनपद्धती हा एक महत्त्वाचा भाग होय.

शिक्षणाची व्याख्या आता अत्यंत व्यापक झाली आहे. ज्या संस्कारांनी विद्यार्थ्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकसित होते, त्या संस्कारसुमुच्चयाला ‘शिक्षण’ हा शब्द लावतात. संस्कारप्रदानाचे कार्य घरी, समाजात व शाळेत चालू असते पण त्यात विशिष्ट पद्धत नसते व सहेतुक योजनाही नसते. हे ‘अनौपचारिक’ शिक्षण होय. पद्धतशीर व शिस्तबद्ध रीतीने संस्कार करण्यासाठी ‘शाळा’ या संस्थेची निर्मिती समाजाने केली . या शालेय वा संस्थांतर्गत शिक्षणाला ‘औपचारिक किंवा रीतसर शिक्षण’ म्हणतात. घरातील आईवडील प्रसंगानुसार मुलांना शिकवतात, त्यांच्या चारित्र्यविकासाकडे लक्ष देतात. आई हा सर्वांत श्रेष्ठ गुरू, पिताही गुरू, असे याचसाठी मानले जाते.

अध्यापनक्रियेचे स्वरूप फार व्यापक आहे. ज्ञानदानाच्या हेतूने माहितीचे पुंज विद्यार्थ्यांच्या हवाली करणे, संचित ज्ञान हेच काय ते ज्ञान व त्याचे रक्षण झाले पाहिजे, अशा कल्पना पूर्वी होत्या. उत्तरोत्तर या कल्पना बदलत गेल्या. शिक्षण व जीवन यांचा परस्परसंबंध आहे ज्ञानाकरिता ज्ञान हे जसे एका अर्थी युक्त आहे, तसेच शक्य तेथे व्यवहारातही त्याच उपयोग करता आला पाहिजे, हेही युक्त आहे. म्हणून ज्ञानप्राप्तीबरोबर ज्ञानाचे उपयोजन आणि कौशल्यांची प्राप्ती यांनाही महत्त्व दिले पाहिजे. तसेच अनेक दृष्टीकोन व मूल्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होतात. अध्यापन म्हणजे केवळ ज्ञानसंक्रमण नसून विद्यार्थांच्या आकलनशक्तीचा व विचारशक्तीची विकास करणारे, त्यांना विविध कौशल्यांची प्राप्ती करून देणारे, त्यांना चांगल्या सवयी लावणारे, त्यांच्या अभिरूचीचा व सौंदर्यदृष्टीचा विकास करणारे, त्यांच्या जीवनविषयक दृष्टीकोनाची व मूल्यांची जोपासना आणि त्यांच्या सर्जनशील शक्तीचा व विवेकबुद्धीचा विकास करणारे अध्यापकाचे कार्य, म्हणजे अध्यापन होय.

अध्यापन व अध्यापन या प्रकिया एकमेकींशी निगडित आहेत. यशस्वी अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याला अधिक ज्ञान होणे आणि त्याची आकलनशक्ती वाढणे, काही नवीन शक्तिसामर्थ्य लाभल्याचा आनंद होणे आणि त्याच्या प्रतिसादातून नव्या अध्यापनाला गती मिळणे. विद्यार्थी शिकला याची साक्ष त्याच्या वर्तनात दिसते. जे समजले नव्हते ते समजले व जे करता येत नव्हते ते करता येऊ लागले, म्हणजे शिक्षण झाले. म्हणून अध्ययन म्हणजे संस्कारग्रहण आणि वर्तनात परिवर्तन व ते घडविण्यास साहाय्य करणे म्हणजे अध्यापन. शिक्षक व विद्यार्थी यांतील क्रियाप्रतिक्रियांच्या या दोन बाजू आहेत, म्हणून शिक्षण ही द्विध्रुव-प्रक्रिया समजली जाते.

विद्यार्थ्यावर होणाऱ्या संस्कारांत शिक्षकाचा वाटा मोठा असतो. शिक्षकाच्या आचारविचारांचा प्रभाव संस्कारक्षम विद्यार्थ्यावर होत असतो. यासाठी प्राचीन काळातील आचार्य सदाचारसंपन्न व शीलसंपन्न राहण्याचा प्रयत्न करीत. त्यामुळेच गुरूची योग्यता मोठी मानली जाई. अध्यापकाची प्रतिष्ठा बऱ्याच अंशी त्याच्या विविध प्रकारच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्या बाबतही अनेक प्रकारचे संशोधन अलीकडे झाले आहे. या गुणवत्तेची सामान्यत: चार क्षेत्रे मानण्यात येतात : (१) अध्यापन विषयाचे क्षेत्र-जे विषय शिकवावयाचे त्यांवर उत्तम प्रभुत्व, ते विषय विद्यार्थ्यांना समजावून देण्याचे कौशल्य, स्वत:चा व्यासंग अद्ययावत ठेवण्याची धडपड, अध्यापनसाधनांचे ज्ञान व त्यांचा कौशल्यपूर्ण उपयोग करण्याचे सामर्थ्य यांचा समावेश या पहिल्या क्षेत्रात होतो. (२) मानसशास्त्राचे ज्ञान—विशेषत: बाल, किशोर व कुमार यांचे मानसशास्त्र शिक्षकाला उत्तम अवगत हवे. (३) मानवी संबंधांचे क्षेत्र—शिक्षकाला विद्यार्थी, सहव्यवसायी व संचालक यांच्यात काम करावयाचे असते. तसेच त्याचा पालकांशी व समाजाशी संबंध येतो.या सर्वांशी वागण्याचे ज्ञान व कला शिक्षकाजवळ असली पाहिजे. (४) नेतृत्व—शिक्षक हा विद्यार्थ्याचा नेता व मित्र असतो. लोकशाही समाजातील नेत्याचे गुण त्याच्या ठिकाणी असले पाहिजेत. विद्यार्थ्याविषयी प्रेम, सहानुभूती व आस्था असणारा शिक्षक हाच उत्तम शिक्षक होऊ शकतो. शिक्षकाची ही गुणवत्ता अध्ययनाने, प्रशिक्षणाने व प्रयत्नाने वाढत असते. अध्यापन करीत असताना शिक्षकाची वृत्ती व दृष्टीकोन ही लोकशाही स्वरूपाची आहेत की उदासीन आहेत किंवा हुकूमशाहीची आहेत, यालाही फार महत्त्व आहे. पहिल्या प्रकाराचा दृष्टिकोन असल्यास विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण होतो व तो स्वतंत्र वृत्तीचा व सहकारशील बनतो, असा प्रयोगांचा निष्कर्ष आहे.

अध्यापनपद्धती : अध्यापनपद्धतीचे स्वरूप एका बाजूने शिक्षणाच्या उद्दिष्टांशी निगडित असते, तर दुसऱ्या बाजूने मन व ज्ञानार्जन यांसंबंधीच्या रूढ कल्पनांशी निगडित असते. त्यामुळे अध्यापनपद्धतीचे स्वरूप बदलत गेल्याचे दिसते. प्राचीन काळात धर्मज्ञान हे स्वर्गप्राप्ती, मुक्ती, पापनाश वा पुण्यप्राप्ती यांचे साधन मानले जात असल्याने व प्रमाणभूत ग्रंथ वा व्यक्ती यांच्याकडून ते मिळवावयाचे असल्याने, गुरूकडून ते ऐकावयाचे व मुखोद्गत करावयाचे, हीच पठणपाठणपद्धती अस्तित्वात होती. व्यावाहरिक शिक्षण उमेदवारीने घेतले जाई. त्यात निरीक्षण व अनुकरण यांवरच भर असे. या परंपरागत पद्धतीला धक्का देण्याचे पहिला प्रयत्न सॉक्रेटीसने केला. शिकणाऱ्याला प्रश्न व प्रतिप्रश्न करून, त्यालाच विचार करायला लावून ज्ञानाचा शोध घेण्याची पद्धती त्याने रूढ केली. या संवादात्मक व प्रश्नप्रधान पद्धतीलाच पुढे ‘सॉक्रेटीसची पद्धती’ हे नामामिधान मिळाले. आपल्या प्राचीन उपनिषदात ही पद्धती आढळते परंतु ही पद्धती फार काळ टिकली नाही. सॉक्रेटीसनंतरच्या जवळजवळ हजार वर्षांच्या काळात खिस्ती धर्ममठांतून पुन्हा पूर्वीची पाठांतरपद्धती रूढ झाली. पवित्र ग्रंथाचे वाचन व पठण एवढेच त्या काळात शिक्षणाचे उद्दिष्ट होते.

सोळाव्या शतकापासून या शब्दनिष्ठ पद्धतीविरूद्ध प्रतिक्रिया सुरू झाली. कोमीनियस हा त्या प्रतिक्रियेचा आद्य प्रतिनिधी व नव्या पद्धतीचा  जनक होय.


बालकांना परिचित व मूर्त वस्तूंचे प्रथम ज्ञान करून द्यावे व नंतर अपरिचित व अमूर्त कल्पनांकडे न्यावे, तसेच बालस्वभावाच्या विकासाशी अध्यापनपद्धती मिळतीजुळती असावी, असे प्रथम त्याने सांगितले. अध्यापन मूर्त करण्यासाठी चित्रमय पुस्तके रचण्याच्या उपक्रम त्याने केला. त्यानंतर प्रचलित शिक्षणपद्धतीला जबरदस्त धक्का दिला तो रूसो याने. रूसो हा बालककेंद्री शिक्षणाचा आद्य प्रणेता होय. शिक्षणात अनुभव व कृती यांना त्याने स्थान दिले. बालकाच्या स्वातंत्र्याचाही तो पुरस्कर्ता होता. रूसोच्या कल्पना प्रत्यक्षात पडताळून पाहण्याचे कार्य पेस्टालोत्सीने केले व त्यांतील उणिवा ओळखून नवी भर घातली. अध्यापनपद्धतीला मानसशास्त्राची बैठक त्याने मिळवून दिली. पेस्टालोत्सीच्याच शाळेत त्याचा सहकारी म्हणून काम करून स्वत:ची अध्यापनपद्धती निर्माण करणारा तत्त्वज्ञ म्हणजे फ्रबेल हा होय. त्याच्या मताप्रमाणे बालकांच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त शक्ती फुलविणे हेच शिक्षकांचे कार्य. म्हणून बालमनाच्या कळ्या फुलविणाऱ्या शिक्षकाला त्याने माळ्याची उपमा दिली व त्या पद्धतीला बालोद्यान असे नाव दिले. अध्यापनात क्रीडाप्रवृत्तीला वाव देऊन भाषा, इतिहास इ. विषय शैशवकुमारावस्थेतील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा उपक्रम इंग्लंडमध्ये कॉल्डवेल कुक याने पुढे केला. त्याने आपल्या पद्धतीला ‘क्रीडापद्धती’ असेच नाव दिले.

पूर्वोक्त प्रयोग पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणाच्या स्तरांवरच होते. माध्यमिक स्तरावर अध्यापनपद्धतीला नवे वळण लावण्याचा यशस्वी प्रयत्न प्रथम हेर्बार्ट याने केला. हेर्बार्टच्या पद्धतीची छाप इंग्लंड, अमेरिका व भारत या देशांतील अध्यापनावर अजूनही आहे. ज्ञानग्रहणाच्या प्रक्रियेत हेर्बार्टने कल्पनांचे साहचर्य यावर विशेष भर दिला आणि त्यातून अध्यपनाचे नवे तंत्र निर्माण केले. पूर्वतयारी उपन्यास, साहचर्य, सामान्यीकरण व उपयोजन या पाच पायऱ्या अथवा पंचपदी हेर्बार्टच्या तंत्रातून त्याच्या शिष्यांनी निर्माण केली. गणित, विज्ञान, भूगोल इत्यादींच्या अभ्यासाला त्या काळात महत्त्व होते. त्या विषयांच्या अध्यापनाला हे तंत्र चटकन लागू पडले व लोकप्रियही झाले. परंतु हेर्बार्टच्या तंत्राला पुढे यांत्रिक व कृत्रिम स्वरूप आले.

फ्रबेलच्या बालविकासाचे सूत्र घेऊन बालकांच्या शिक्षणाचा प्रयोगशील दृष्टीने अधिक विचार  मारिया माँटेसरी या शिक्षणतज्ञेने केला. द्ररिद्री व मंदबुद्धी असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाबाबत प्रयोग करून तिने आपली पद्धती शोधून काढली. ‘बालक-मंदिर’ या नावाने तिची संस्था ओळखली जाते. या मंदिरात इंद्रियशिक्षण देणाऱ्या व इतर उपकरणांच्या साहाय्याने मुले स्वप्रयत्नाने बुद्धिविकास साधतात व सामुदायिक जीवनातून सामाजिक विकास व आत्मनियंत्रणाची सवय आत्मसात करतात.

अमेरिकेत शब्दनिष्ठ अध्यापनाविरूद्ध टीका बरीच जुनी आहे. शिकवणे म्हणजे संशोधन, नवा अनुभव घेणे, या विचारांचा पुरस्कार प्रथम आर्मस्ट्राँग याने केला व ‘ह्यूरिस्टिक पद्धती’ शोधली. भूगोल, विज्ञान, गणित आदी विषयांना ती विशेष उपयुक्त आहे. भूगोल, विज्ञान या विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निसर्गाकडे जाणे, सहली काढणे इ. उपक्रमांना फ्रॅन्सिस पार्कर याने आरंभ केला. पण अनुभवनिष्ठ व कृतियुक्त शिक्षणाला चालना दिली ती जॉन ड्यूई यांनी. जॉन ड्यूई यांनी शिकागो विद्यापीठाला जोडलेल्या प्राथमिक शाळेत अध्यापनपद्धतीबाबत नवे प्रयोग केले. आपण शिकतो म्हणजे कृतीद्वारा प्रयोग करतो. शिकण्यासाठी काही प्रयोजन वा हेतू लागतो. हे प्रयोजन गरजांतून वा समस्यांतून मिळते. समस्या-उकल हीच खरी शिकण्याची पद्धती, तीतूनच बौद्धिक विकास होतो आणि असे अध्यन समाजात घडत असल्याने सामाजिक विकासही होतो. अनुभवाची देवाणघेवाण ही शिकण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. सध्याच्या परिवर्तनशील जगात व्यक्तीच्या ठिकाणी नव्या परिस्थितीशी सामंजस्य राखण्याचे ज्ञान व कौशल्य आले पाहिजे, अशी ड्यूईची विचासरणी आहे. व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून समाजाची अखंड प्रगती साधण्यास आवश्यक अशा पद्धतीचे विवेचन ड्यूईने केले.सामुदायिक जीवनातून व सप्रयोजन-कृतीतून मिळणारा अनुभव म्हणजे शिक्षण, या विचारातूनच किलपॅट्रिक यांची योजना-पद्धती वा प्रकल्प-पद्धती निर्माण झाली. प्रकल्प-पद्धतीचा मुख्य भर विद्यार्थ्यांतील उपक्रमशीलता, स्वतंत्र विचारशक्ती, जबाबदारीची जाणीव व सहकार्यप्रवृत्ती वाढविण्यावर आहे. विद्यार्थ्यांनी माहितीचे भारे डोक्यात रिचविण्याऐवजी ज्ञानाचा खरा उपयोग करण्यास शिकावे, ही तिच्यात दृष्टी आहे.


अमेरिकेप्रमाणेच यूरोपमध्येही बालमानसशास्त्रावर आधारित अशा कृतिशील शिक्षणाची चळवळ विसाव्या शतकात सुरू होती.


प्राचीन भारतातील अध्यापद्धती अध्ययनविषयाला धरून असल्याने तिच्यात विविधता आढळते. तदनंतरचे मध्ययुग व ब्रिटिश राजवटीपासूनचा आधुनिक काळ, असे पुढचे दोन कालखंड आहेत.


प्राचीन काळी वेदत्रयींचे अध्ययन गुरूकडून संथा घेऊन होई. ते ग्रंथ कंठस्थ करण्याची पद्धती होती पण वेदांगांच्या साहाय्याने वेदमंत्राचा अर्थ व विनियोग समजून घ्यावा लागे. श्रवणाबरोबरच मनन व निदिध्यास यांवरही भर असे. कृषी, पशुपालन, वाणिज्य, स्थापत्य, मूर्तिकला, नृत्य, संगीत, सुतारकाम, धातुकाम यांसारखे ज्ञानाचे विषयही असत. तक्षशिला, नालंदा यांसारख्या विद्यापीठांतील उच्च शिक्षणात वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नप्रतिप्रश्न यांवर व चिकित्सक बुद्धीचा परिपोष करण्यावर कटाक्ष असे. संस्कृत-प्राकृतातील प्रचंड टीकासाहित्य व भाष्ये हे त्याचे फळ आहे. धनुर्विद्या, आयुर्वेद अन्य व्यवहारोपयोगी विद्या व कला यांत प्रत्यक्षिकांचा भाग मोठा असे. पाठांतराच्या बरोबरीनेच निरीक्षण, अनुकरण, मार्गदर्शन व चिंतन यांवरही भर होता.


मध्ययुगात चिकित्सक अध्ययनाची परंपरा लोपली. पाठांतराने वेदविद्या जिवंत ठेवण्याचीच धडपड करावी लागली. अन्य शास्त्रे व विद्या ग्रंथांतच राहिल्या. सामान्य जनांना लेखन-गणनाचे प्राथमिक शिक्षण तेवढे मूळाक्षरे गिरवून मिळे. त्यात विशिष्ट पद्धती नव्हती. व्यवसायांचे शिक्षण परंपरेने व उमेदवारी करूनच मिळवावे लागे.


ब्रिटिश अमदानीत ब्रिटनमधील अध्यापनपद्धतीच येथील शिक्षणात रूजल्या. प्राथमिक स्तरांवर घोकंपट्टीच्या जोडीला वस्तुपाठपद्धती सुरू झाली. माध्यमिक स्तरावर हेर्बार्टची पंचपदी व प्रश्नोत्तरपद्धती यांचा अवलंब झाला. इंग्रजीसारखी परकी भाषा शिकण्यासाठी प्रत्यक्षपद्धती व संवादपद्धती रूढ झाल्या. अलीकडे मूलभूत घटकरचनांवर आधारलेली पद्धती उपयोगात आणली जात आहे. पूर्वप्राथमिक शिक्षणात फ्रेबेल व माँटेसरी यांचे अनुकरण झाले आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांत केवळ पुस्तकी शिक्षण देत व माध्यमिक शिक्षणात इंग्रजी माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर होई. या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनाशी काही संबंध नसे. या सर्वांचे दुष्परिणाम टाळून, जीवन जगत असताच जावनाची तयारी करून देणाऱ्या उद्योगमूलक शिक्षणाची कल्पना म. गांधींनी पुढे मांडली. ‘नयी तालिम’, ‘बुनियादी शिक्षा’ अशा नावांनी ती ओळखली जाते. एखादा उत्पादक व्यवसाय—उदा., शेती, सूतकताई—घेऊन त्याभोवती भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे इत्यादींचे अध्ययन गरजेप्रमाणे गुंफावयाचे, अशी तिच्यात कल्पना आहे. म्हणजे समवाय (गुंफणे) हे अध्यापनाचे मुख्य सूत्र. त्यामुळे ज्ञानाचे चांगले आकलन होते व त्याचा उपयोग कळतो. हा उद्योग सामुदायिक वातावरणात करावयाचा असल्याने विद्यार्थाचा सामाजिक विकासही त्यात घडून येतो.


आजच्या प्राथमिक शाळांतील पद्धती हे अनेक पद्धतींचे एक मिश्रण आहे. प्राथमिक शिक्षणात बालकांची कृतिशीलता, क्रीडाप्रवृत्ती, त्यांच्या गरजा आणि प्रत्यक्ष अनुभव-निरीक्षण यांच्यावर भर देण्याकडे कल आहे. माध्यमिक शिक्षणात हेर्बार्टच्या पंचपदीला प्रश्नोत्तरे, चर्चा, निरीक्षण,


प्रयोग इत्यादींची जोड देण्यात आली आहे.काही शाळांतून स्वाध्याय व प्रकल्पपद्धतीचाही थोडाफार अवलंब केला जातो. उच्च शिक्षणात व्याख्यान व विवरण यांचाच प्राय: अवलंब केला जातो. तसेच व्याख्यान, चर्चा, परिसंवाद, कृतिसत्रे, प्रयोगशाळा यांचाही हळूहळू प्रसार होत आहे. काही महाविद्यालयांत स्वाध्यायपद्धतीवरही भर आहे.


पाठाचे नियोजन व तंत्र: वर्षभरात शिकवावयाचा पाठ्यक्रम शिक्षकांना उपलब्ध करून दिला जाई. वर्षाचे तीन वा चार विभाग करून प्रत्येक विभागात किती पाठ्यक्रम पुरा करावयाचा, ते ठरविले जाई. पुढे ही वाटणी महिनावार, सप्ताहवार वा दैनंदिनही केली जाई. पाठ्यक्रम संपविणे म्हणजे त्या विषयाचे पाठ्यपुस्तक संपविणे, अशीच प्राय: समजूत असल्याने पाठ्यपुस्तकांच्या पृष्ठांची वाटणी म्हणजे अध्यापनाचे नियोजन समजले जाई. यात सुधारणा होऊन पाठ्यक्रमातील विषयांची यादी करून एकेक भाग किती दिवसांत व तासांत संपविता येईल, याचा विचार होऊ लागला.


मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापनपद्धती यांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे पाठनियोजनाच्या कल्पना बदलल्या. अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याच्या ज्ञानग्रहणप्रक्रियेला मदत करण्याचे काम. प्रत्येक विषयाच्या अध्यापनाची उद्दिष्टे नमूद करून विद्यार्थ्याच्या वर्तनात कोणते परिवर्तन घडवून आणावयाचे, त्याची आकलनशक्ती व कौशल्य यांत कोणती भर घालावयाची, यांचा प्रथम विचार केला जातो. ही उद्दिष्टे पार पाडण्यासाठी पाठ्यक्रमातील उपयुक्त घटक शोधले जातात. या घटकांची सुव्यवस्थित जुळणी कशी करावयाची व त्यासाठी कोणती अध्यापनसामग्री उपयोगी पडेल, याचा विचार केला जातो. त्यानंतर अध्ययन-प्रसंगाचा विचार होतो. हे अध्ययन-प्रसंग म्हणजे विद्यार्थ्यांना अनुभव घेण्याची संधी. एखादी समस्या सोडविण्यासाठी, काही नवीन रचना करण्यासाठी किंवा नव्या विषयांचे आकलन करण्यासाठी शिक्षक—विद्यार्थ्यांनी करावयाच्या कृती, हा अध्ययन-प्रसंगाचा भाग होय. अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करता येईल, विद्यार्थ्याला त्याच्या कुवतीनुसार प्रगती करण्याला साहाय्य कसे करता येईल इत्यादींचा विचारही याच वेळी करावा लागतो. अखेरच्या टप्पा मूल्यमापन, म्हणजे विद्यार्थ्याची प्रगती विविध चाचण्यांनी पारखणे, हा होय. पाठनियोजनाची ही शृंखलाबद्ध प्रक्रिया आहे.


पाठाचा आराखडा: दैनंदिन पाठाची रूपरेषा लिहून काढून आपला पाठ काटेकोर व सुव्यवस्थित करावा, अशी प्रशिक्षार्थी विद्यार्थ्याकडून अध्यापन-विद्यालयात अपेक्षा असते. प्रशिक्षित शिक्षक कागदावर जरी आराखडा लिहित नसले, तरी स्थूल आराखडा त्यांच्या डोळ्यासमोर असतोच. हेर्बार्टच्या पद्धतीनुसार पूर्वतयारी म्हणजे नव्या विषयाशी संबद्ध असलेले विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान तपासणे व पूर्वानुभव जागृत करणे, हा पहिला टप्पा. पाठाची प्रस्तावना व हेतुकथन हेही त्यात समाविष्ट असते. दुसरा टप्पा म्हणजे विषयोपन्यास. शिकावावयाच्या भागाचे दर्शन व विवेचन. प्रश्नोत्तरे, चर्चा, वाचन, निरीक्षण, दृष्टांत यांच्या साहाय्याने विषयाचे स्वरूप ह्या टप्प्यात स्पष्ट केले जाते. तिसऱ्या टप्प्यात सामान्यीकरण वा निष्कर्ष काढणे. चौथा टप्पा मिळविलेल्या ज्ञानाचे उपयोजन व दृढीकरण. अखेरीस विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणे. हा आराखडा पुढील तीन सदरांमध्ये लिहिता येतो : (१) उद्दिष्टे (२) पाठ्यवस्तूचे घटक व उपघटक (३) अध्ययन-प्रसंग.


अध्यापनाची सूत्रे : शिक्षकाचे अध्यापन सुगम, सुस्पष्ट व परिणामकारक व्हावे आणि विद्यार्थ्यांची ज्ञानग्रहणाची प्रक्रिया सुकर व्हावी, यासाठी मानसशास्त्राला धरून काही सिद्धांत पुढे आले आहेत. रूसो, पेस्टालोत्सी, फ्रबेल, हर्बर्ट स्पेन्सर व हेर्बार्ट यांच्या सर्वसामान्य नियमांना सूत्रांचे स्वरूप आले आहे. पैकी काही प्रमुख पुढीलप्रमाणे :


(अ) ज्ञाताकडून अज्ञाताकडे : शिकवावयाचा नवा, अपरिचित विषय एकदम पुढे न मांडता परिचित विषयावरून चर्चेला आरंभ करून त्याची कक्षा वाढवीत अज्ञात वा अपरिचिताचे ज्ञान करून द्यावे, असा या सूत्राचा अर्थ. त्यायोगे नवीन विषय शिकणे कंटाळवाणे होत नाही आणि जुन्यानव्या ज्ञानाचा मेळही बसतो.


(आ) सोप्याकडून कठिणाकडे : विद्यार्थ्यांचा उत्साह टिकवूनच शिकवायचे असल्याने सोपा भाग त्यांना समजावून देत क्रमश: कठीण भागाकडे त्यांना नेणे.


(इ) मूर्ताकडून अमूर्ताकडे व (ई) आधी अनुभव, मग नियम : ही दोन्ही सूत्रे जवळजवळ एकाच अर्थाची आहेत. मूर्त वस्तूंच्या संबंधात अनुभव आल्यानंतर त्यांच्या संबंधातील अमूर्त, तर्कशुद्ध नियम विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिला जावा. असा या दोन्ही सूत्रांचा अर्थ आहे.


(उ) निसर्गाचे अनुसरण: ‘निसर्ग’ याचा अर्थ ‘बालकाच्या स्वाभाविक प्रेरणा व प्रवृत्ती’ असा आहे. नव्या वस्तूंबद्दल कुतूहल, वस्तूंचा संग्रह, वस्तूंशी चाळवाचाळव व त्यांची घडामोड, क्रीडा, अनुकरण या बालकाच्या सहजप्रवृत्ती आहेत. त्यांचा उपयोग करुन घेतला, तर ज्ञानार्जन हे कष्टप्रद न होता आनंदप्रद होईल.


 (इ) पूर्णाकडून विभागाकडे : आधुनिक मानसशास्त्राप्रमाणे कोणत्याही वस्तूचे संपूर्ण रूप वा आकृती प्रथम ग्रहण केली जाते. नंतर तिच्या अंगोपांगांकडे लक्ष जाते. प्रथम संपूर्ण शब्दाकडे व नंतर त्यातील सुट्या अक्षरांकडे मुलांचे लक्ष जाते. या पद्धतीचा अवलंब कथा,चित्रे,कविता इत्यादींच्या रसग्रहणात व प्राथमिक भाषाशिक्षणातही केला जातो.


(ए) विशिष्टाकडून सामान्याकडे व (ऐ) सामान्याकडून विशिष्टाकडे : ही दोन्ही सूत्रे परस्परांना पूरक अशीच आहेत. ही दोन्ही सूत्रे म्हणजे तर्कशास्त्रांतील अनुक्रमे विगामी व निगामी पद्धती होत.


या परंपरागत सूत्रांच्या जोडील आधुनिक मानसशास्त्राच्या आधारे प्राथमिक व माध्यमिक स्तरांवर उपयोगी पडणारी पुढील सूत्रेही सांगितली जातात : (१) विद्यार्थ्यांना गरज भासली की अध्ययनाचे कार्य सुकर होते. गरज ही मोठी प्ररेक शक्ती आहे. (२) जितक्या अधिक ज्ञानेंद्रियांचा उपयोग शिकताना होईल, तितके ज्ञानग्रहण प्रभावी होते. (३) विद्यार्थ्यांच्या आस्था-अभिरुचीला आवाहन करून शिकविल्यास अध्ययन रोचक होते. (४) विद्यार्थी पाठात सहभागी झाले, तर अध्यापन फलदायी होते. (५) विद्यार्थ्यांची मानसिक तयारी व परिपक्वता लक्षात घेतली जावी. (६) विद्यार्थांची मने भावनादृष्ट्या स्थिर असतील, तरच त्यांचे अध्ययनाकडे लक्ष लागते. (७) धाक-शिक्षेपेक्षा उत्तेजन वा प्रशंसेमुळे अध्ययन परिणामकारक होते.


पाठांचे प्रकार : (१) उद्गामी पाठ : या प्रकाराच्या पाठात संकलित माहितीवरून सर्वसाधारण नियम काढावयाचा असतो. ज्यांत विशेषणे वापरलेली आहेत, अशा अनेक वाक्यांच्या निरीक्षणानंतर विशेषणाची व्याख्या मुले तयार करू शकतात. अशा पाठात निरीक्षणासाठी पुष्कळ गोष्टी घेतात आणि व्यावहारिक अनुभवांवरून नियमांचा पडताळा पाहतात. या पद्धतीस शास्त्रीय पद्धत म्हणतात. तिला मानसशास्त्राचाही आधार आहे. शास्त्र, गणित, व्याकरण, भूगोल इ. विषयांचे बरचसे अध्यापन उद्गामी पद्धतीने करणे इष्ट असते.


(२) अवगामी पाठ : सामान्यवरून विशिष्ठाचे ज्ञान मिळविणे व समस्यांची उकल करणे म्हणजे अवगामी पाठ. हवामानाची तत्त्वे, भूमितीतील प्रमेये इ. शिकवल्यानंतर त्यांवरील उदाहरणे सोडवावयास सांगणे, ही अवगामी पाठाची उदाहरणे होत.


(३) समालोचन पाठ : या पाठाचा हेतू मिळालेल्या ज्ञानाची उजळणी व व्यवस्थापन नव्या दृष्टिकोनातून करणे हा असतो. त्यासाठी तुलना, वर्गीकरण, मूल्यमापन इ. प्रक्रियांचा उपयोग करता येतो. समालोचनाचे कार्य विद्यार्थ्यांवर सोपविल्यास त्यांस स्वावलंबनाची सवय लागते आणि विषयात नवी गोडी निर्माण होते.


(४) आवृत्तिपाठ : नवसंपादित ज्ञान व कौशल्य कायम राहण्यासाठी त्यांची पुनरावृत्ती करणे जरूर असते. त्या दृष्टीने आवृत्तिपाठ उपयुक्त ठरतो. अशा पाठात सारखेपणामुळे येणारी नीरसता शिक्षक आपल्या कल्पकतेने टाळू शकतो. एखाद्या धड्यातील आशयाचे कथन करून घेणे, तत्संबंधी एखादे पत्र लिहावयास सांगणे अथवा त्याचे नाट्यीकरण करणे इ. प्रकारेही आवृत्तिपाठ घेता येतो.


(५) रसग्रहणात्मक पाठ : निसर्गाचे, ललित कलाकृतीचे व साहित्यकृतीचे सौंदर्य प्रतीत करून देणे व सौंदर्याभिरुची निर्माण करणे ह्या हेतूने दिलेला पाठ म्हणजे रसग्रहणात्मक पाठ होय. प्रत्यक्षात काव्य अथवा काव्यमय गद्य यांपुरताच रसग्रहणात्मक पाठ घेतला गेला, तरी चित्रकला, संगीत व मूर्तिकला यांसंबंधीही रसग्रहणात्मक पाठ घेता येतात.


अध्यापनाच्या युक्त्या (तंत्रे) : प्रश्न : प्राचीन काळापासून प्रश्नांचा उपयोग, विद्यार्थ्यास काय माहीत आहे, ते समजून घेण्यासाठी चालू आहे. पण प्रश्नांची रचना करणे सुलभ नसते. प्रश्न सोपा, सुटसुटीत, मुद्देसूद, नि:संदिग्ध व विचारप्रवर्तक असावा लागतो. कार्यकारणभाव शोधावयास लागणारे प्रश्न, परिणामशोधक प्रश्न व तुलना करावयास सांगणारे प्रश्न विचारप्रवर्तक असतात. त्यांचा उपयोग प्रतिपादन-टप्प्यात होतो. माहितीपर प्रश्नांचा उपयोग प्रस्तावनेत आणि परीक्षक प्रश्नांचा उपयोग उपयोजनात होतो.


कथन : कथन या अध्यापनयुक्तीचे महत्त्व फार आहे. गोष्टी मुलांना मनापासून आवडतात. भाषा, इतिहास या विषयांत कथनकौशल्याला महत्त्व असते. कथनाचा सर्वांत महत्वाचा गुण समरसता होय. निर्विकारपणे, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हलू न देता केलेले कथन नीरस ठरते. कथनाची भाषा सोपी, नि:संदग्धि व समर्पक असावी. लहान मुलांना सांगावयाच्या कथांत शब्दांची व कल्पनांची पुनरुक्ती असावी. उचित हावभावांची जोड दिल्याने कथन परिणामकारक होते. आवाजात योग्य चढउतार करण्यानेही कथनात रंग भरतो.


शब्दिक दाखले : अध्यापकाला पुष्कळदा अमूर्त कल्पनांचे स्पष्टीकरण करावे लागते. त्यासाठी शाब्दिक दाखले, दृष्टांत, उदाहरणे इत्यादींचा उपयोग होतो.


देखरेखीखालील अभ्यास : अशा अभ्यासाचे दोन हेतू असतात : (१) मुलांना स्वावलंबनाची सवय लागावी व (२) मुलांकडे वैयक्तिक लक्ष देता यावे. हल्ली नित्याच्या वेळापत्रकात किंवा त्यानंतरही अशा अभ्यासासाठी तास ठेवण्याची पद्धत रूढ होत आहे. देखरेख करणारा शिक्षक दक्ष व उत्साही असणे इष्ट असते.


अध्यापनाची साधने : (अ) आवश्यकता : अध्ययन सार्थ व सुस्पष्ट करण्यासाठी साधनांची मदत होते. साधने विवेचनीय विषयाला मूर्त रूप देतात व त्यामुळे ज्ञानग्रहण सुलभ होते. दोन अधिक दोन बरोबर चार या कल्पनेचा प्रत्यय मणी पुढे ठेवल्याने झटकन येतो. लहान मुलांना शिकवताना शक्य तितक्या इंद्रियांचे साहाय्य घ्यावे, हे तत्त्व सर्वसामान्य आहे. म्हणून माँटेसरी-पद्धतीत इंद्रियशिक्षणाची विविध साधने वापरतात. साधनांचा उपयोग अर्जित ज्ञान टिकवण्यासाठीही होतो. सचित्र कथेतील अधिक तपशील दीर्घतर कालावधीपर्यंत मुलांच्या ध्यानात राहतो. भौतिक शास्त्रांच्या अध्यापनात चलत्‌चित्रपटांचा उपयोग केल्यास विषयबोध चांगला होतो. साधनांचा आणखी एक उपयोग म्हणजे ज्ञानव्यवस्थापन हा होय. इतिहासातील एखाद्या कलखंडाचा अभ्यास संपल्यानंतर नकाशे व आलेख यांच्या साहाय्याने मिळविलेले ज्ञान सुव्यवस्थित व पक्के करता येते. अशा रीतीने साधनांच्या योगे ज्ञानग्रहण सुकर होत असले, तरी त्यांचा उपयोग विवकाने व उतरत्या भाजणीने करावयाचा असतो. प्राथमिक शाळेत सर्वच विषयांच्या अध्यापनात साधनांचा उपयोग आवश्यक असतो. माध्यमिक व उच्च शिक्षणात त्यांचा उपयोग कमी कमी होत जातो. साधनांचा उपयोग अमूर्त कल्पनांच्या द्वारा ज्ञानसाधना करण्याची शक्ती येईपर्यंतच करावयाचा असतो.


(आ) साधनांचे प्रकार : पाठ्यपुस्तक—हे अध्यापनाचे प्रमुख साधन होय [→पाठ्यपुस्तके]


प्रत्यक्ष वस्तू—प्रत्यक्ष वस्तूंच्या द्वारा होणारे ज्ञान नि:संदिग्ध असते. प्राथमिक शाळेत निसर्गाभ्यासाठी फळे, फुले, वनस्पती इ. वर्गात प्रत्यक्ष आणता येतात. भूगोलाच्या अभ्यासात टेकडी, नदी, दरी इ. सहलीस नेऊन दाखविता येतात. रासायनशास्त्रातील गंधक व अन्य पदार्थ, विज्ञानातील तरफादी यंत्रे प्रत्यक्ष दाखविता येतात.


प्रतिकृती—जेव्हा प्रत्यक्ष वस्तू आणणे शक्य नसते, तेव्हा तिची प्रतिकृती उपयोगी ठरते. वाफेच्या यंत्राचे कार्य प्रतिकृतीच्या द्वारा स्पष्ट होते. अनुक्रमश: होणाऱ्या यांत्रिक प्रक्रियांच्या स्पष्टीकरणासाठी प्रतिकृतीचा उपयोग आवश्यक असतो.


चित्रे व तक्ते-चित्रांचा उपयोग अनेक विषयांच्या अध्यापनात होऊ शकतो. शब्दांचे व कृतीचे ज्ञान चित्राच्या साह्याने करून देता येते. तसेच लेखनाच्या अध्यापनातही चित्रांचा उपयोग चांगला होतो.


आकृत्या-गणित व भौतिक शास्त्रे यांच्या अध्यापनात आकृत्या आवश्यक असतात. शास्त्रीय प्रयोगातील विविध वस्तूंच्या मांडणीची आकृती काढता येणे, हे शास्त्राध्ययनाचे एक आवश्यक अंग होय.


नकाशे-इतिहास व भूगोल यांच्या अध्यापनात अनेक प्रकारे नकाशांचा उपयोग होतो. उठावाचे नकाशे म्हणजे प्रतिकृतीचाच एक प्रकार होय. भूमीची उंचसखलता, पाण्याच्या प्रवाहाची दिशा इत्यादींसाठी त्यांचा उपयोग होतो.


आलेख-आलेखांचा विशेष उपयोग भौगोलिक व आर्थिक विषयांत होतो. व्यापारी मंडळाच्या उत्पादनात व नफ्यातोट्यांत सालवार होणारे फरक आलेखांच्या द्वारा दाखवितात. भूगोलातील वार्षिक व महिनावार पर्जन्यमान व इतिहासातील घडामोडींचा कालानुक्रम इत्यादींसाठी आलेखांचा उपयोग होतो.


काही विशेष साधने : फळा-फळ्याचा उपयोग सर्व विषयांच्या अध्यापनात होतो. त्यासाठी चांगल्या हस्ताक्षराची व चित्र काढण्याच्या कसबाची गरज असते. फळ्याच्या बहुविध उपयुक्ततेमुळे त्यास शिक्षकाचा मित्र म्हणतात.


दृक्श्राव्य साधने : आधुनिक दृक्साधनांत चित्रदीप, अंतरोपरिद्रश, चित्रपट्टीप्रक्षेपक व चित्रक्षेपक यांचा समावेश होतो. या चार साधनांनी एकाच विषयावरील चित्रांची मालिका क्रमवार दाखविता येते. अशा चित्रमालिका इतिहास, भूगोल, भौतिक शास्त्रे इ. विषयांच्या अध्यापनात फार उद्धोधक ठरतात. त्यांपैकी पहिल्या तीन साधनांचा उपयोग करताना, मध्येच थांबून शिक्षकास योग्य ते स्पष्टीकरण करता येते. चलच्चित्रपटांत अधिक आकर्षकपणा असतो. ही साधने वापरली, तरी प्रक्षेपणपूर्व मार्गदर्शन व प्रक्षेपणापणोत्तर चर्चा आवश्यक असतात व त्यांसाठी शिक्षकास योजना व पूर्वतयारी करावी लागते. अन्यथा ही साधने केवळ करमणूक करतात व अध्यापनाचे उद्दिष्ट सफल होत नाही. पाश्चात्य देशांत चलच्चित्रपट व तत्संबंद्ध बोधपुस्तिका तयार मिळतात. तिकडे या दृक्साधनांचा उपयोग फार मोठ्या प्रमाणावर होतो.


आधुनिक श्राव्य साधनांत ग्रामोफोन, फीतमुद्रक व नभोवाणी यांचा समावेश होतो. ग्रामोफोन व फीतमुद्रकाचा उपयोग संगीतशिक्षणात विशेष होतो. ग्रामोफोन व फीतमुद्रक ही साधने भाषाशिक्षणासही फार उपयुक्त आहेत. परकी भाषा शिकविताना उच्चार, आघात इत्यादींचे प्रत्यक्ष शिक्षण तज्ञांची भाषणे ऐकवूनच देता येते. फीतमुद्रकाच्या द्वारा मुलांचे वाचन व भाषण मुद्रित करून त्यांस ऐकविता येते व अशा रीतीने त्यांस स्वत:च्या दोषांचे प्रत्यक्ष ज्ञान घडते. ठराविक कालांतराने अशी मुद्रिते करीत गेल्यास वाचनात व भाषणात होणारी सुधारणा दृष्टोत्पत्तीस येते.


हल्ली सर्व प्रगत देशांत नभोवाणीवरून खास शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येतात व या कार्यक्रमांतून सर्व शालेय विषयांचे शिक्षण होऊ शकते. आपल्या देशातही ही प्रथा सुरू झाली आहे. या कार्यक्रमांचा पूर्ण फायदा होण्यासाठी श्रवणपूर्ण मार्गदर्शन व श्रवणोत्तर चर्चा यांची जरूरी असते. शिवाय नभोवाणीच्या कार्यक्रमाची वेळ ठरलेली असते. तो कार्यक्रम ऐकविण्यासाठी वेळापत्रकात बदल करावा लागतो. नभोवाणीवरील कार्यक्रम ध्वनिमुद्रित करून जरूर त्या वेळी त्याचा फायदा घेता येतो.


बोलपट, दूरचित्रवाणी व संगणक ही अत्याधुनिक साधने होत. बोलपटांना, विशेषत: माहितीपटांना व अनुबोधपटांना, शैक्षणिक दृष्टीने महत्त्व आहे. विशेषत: भूगोल व विज्ञान यांच्या अध्यापनात बोलपट उपयुक्त ठरतात. प्रगत देशांत शालेय शिक्षणासाठी दूरचित्रवाणीचा उपयोग केला जात आहे. पाश्चमात्य देशांत अध्यापनासाठी अध्यापनयंत्रांचाही आता उपयोग होऊ लागला आहे. त्यातून क्रमान्वित अध्यापनाचे तंत्र निर्माण झाले आहे.


आधुनिक विचारप्रवाह असा आहे, की नभोवाणी, बोलपट व दूरचित्रवाणी यांच्या साहाय्याने तज्ञ शिक्षकांकडून दूरदूरच्या अनेक विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी एकसमयावच्छेदे ज्ञानदान करता येते व म्हणून या साधनांचा उपयोग करून शिक्षकांचे श्रम व वेळ वाचवावीत आणि त्यांना अधिक महत्त्वाचे सूचनात्मक विचारप्रवर्तन करण्यास मोकळे करावे. असे केल्याने शिक्षणसंस्थांतील वाढत्या विद्यार्थी संख्येची व शिक्षकांच्या तुटीची समस्या सुटेल. अधिक गुणवान व कार्यक्षम शिक्षक नेमणे शक्य होईल, त्यांना विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष देणेही शक्य होईल व याचा परिणाम शिक्षणाचा कस सुधारण्यात होईल.


 वस्तुसंग्रहालये व कलासंग्रहालये : या दोन्ही संग्रहालयांचा उपयोग वाढत्या प्रमाणात करण्याची प्रवृत्ती प्रगत देशांत आढळते. वस्तुसंग्रहालयांचा उपयोग सांस्कृतिक ज्ञानबोधासाठी व कलासंग्रहालयांचा उपयोग सौंदर्यप्रतीती घडविण्यासाठी होतो. बहुतेक देशांतील, विशेषत: भारतातील, शालेय शिक्षणातील एक उणीव अशी आहे, की त्यातून सौंदर्यशोधक व सौंदर्यास्वादक दृष्टी निर्माण होत नाही. कलासंग्रहालयांशी मुलांचा परिचय वाढविल्याने ही दृष्टी निर्माण होईल व त्यांचे जीवन अधिक समृद्ध होण्यास मदत होईल.


विशिष्ट विषयांचे अध्यापन व अध्यापनपद्धती : अध्यापनाच्या उद्दिष्टांनुसार अध्यापनपद्धतीतही फरक आढळतो. मातृभाषेच्या अध्यापनात आधी लेखनवाचनादी गोष्टी निरीक्षण-अनुकरणपद्धतीने शिकविल्यानंतर, प्रमुख उद्दिष्ट विचारशक्तीचा विकास करणे हे असते. त्यासाठी समस्यानिष्ठ पद्धतीचा अवलंब करावा लागतो. उलट परभाषांच्या अध्यापनात निरीक्षण-अनुकरण पद्धतीचाच उपयोग होतो. कारण त्याचे उद्दिष्ट परकीय भाषा आत्मसात करणे हे असते. गणितात गणनकौशल्याच्या अध्यापनासाठी परिपाठपद्धतीचा अवलंब करावा लागतो. अंक ही अमूर्त कल्पना पटविण्यासाठी मूर्ताकडून अमूर्ताकडे जावे लागते व समस्या-उकलनाचा महत्त्वाचा भाग समस्यानिष्ठ पद्धतीने शिकवावा लागतो. इतिहासाच्या अध्यापनात मुलांना सत्यान्वेषण करता यावे म्हणून संशोधनपद्धती वापरतात. नैतिक मूल्ये बिंबविण्यासाठी अनुमानपद्धतीचा वापर करतात. भूगोलाच्या अध्यापनात निसर्गाचा मानवी जीवनावरील प्रभाव स्पष्ट करण्यासाठी निरीक्षण-अनुमान-पद्धती उपयोगी पडते. विज्ञान शिकविण्याचे उद्दिष्ट भौतिक घटनांतील कार्यकारणभाव समजावा हे असल्यामुळे, त्या विषयाच्या अध्यापनात विशिष्टाकडून सामान्याकडे जाणाऱ्या उद्गामी पद्धतीचा अवलंब करावा लागतो. कलांच्या अध्यापनात सौंदर्यप्रतीती व्हावी न सौंदर्यनिर्माणशक्ती विकसित व्हावी हा हेतू असतो. यासाठी निरीक्षण, तुलना, समालोचन, अनुकरण इ. प्रतिक्रियांचा उपयोग करावा लागतो. सर्व शालेय विषयांच्या अध्यापनात ज्ञानग्रहण हे उद्दिष्ट असल्यामुळे ज्ञानदानासाठी कथनाचा व ज्ञान पक्के करण्यासाठी परिपाठांचा अवलंब करावा लागतो.


काही संकीर्ण प्रश्न :(अ) वर्गशिक्षण व व्यक्तिगत शिक्षण : आधुनिक मानसशास्त्रातील संशोधनानुसार सर्व मुलांना ज्ञानाचे ग्रहण सारख्याच गतीने करता येत नाही म्हणून वर्गशिक्षणाची पद्धती त्याज्य असा विचारप्रवाह सुरू झाला. इंग्रज शिक्षणतज्ञ बॅलर्ड याने वर्गशिक्षण कालच्युत ठरविले. पण व्यक्तिगत शिक्षण’ कितीही स्पृहणीय असले, तरी व्यवहार्य नाही. सर्वच देशांतील वाढती विद्यार्थीसंख्या लक्षात घेता व्यक्तिगत शिक्षणासाठी शिक्षक पुरविणे अशक्य आहे. शिवाय मानसशास्त्रज्ञांच्या मते इतिहास, वाङ्‌मय यांसारखे स्फूर्तिप्रद विषय शिकविण्यासाठी मोठे वर्ग असणे आवश्यक असते. भावनासंक्रमणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी समूह लागतो. समाजशास्त्रदृष्टया वर्ग शिक्षणाचे वा सामूहिक शिक्षणाचे काही फायदे आहेतच. म्हणून वर्गशिक्षण व व्यक्तिगत शिक्षण यांमधील सवर्णमध्य साधण्यासाठी प्रवृत्ती निर्माण झाली. यासाठी वर्गातील विद्यार्थीसंख्या मर्यादित करणे हा एक उपाय होय. अशी मर्यादा घातल्याने वर्गशिक्षण व व्यक्तिगत शिक्षण दोन्ही साधतात. हा उपाय आर्थिक टंचाई असलेल्या विकासनशील देशांत शक्य होत नाही. दुसरा पर्याय म्हणजे वर्ग मोठा ठेवून त्याचे व्यक्तिभेदाप्रमाणे गट पाडणे, व्यक्तिभेदास अनुसरून स्वाध्याय व गृहपाठ देणे व मुलांस नेतृत्व देऊन त्यांचे साह्य घेणे हा होय. हा पर्यायही फारसा व्यवहार्य नाही. शिक्षणाचा दर्जा खालावण्यास वर्गातील वाढती संख्या अंशत: जबाबदार आहे. पण ही संख्या कमी करण्यासाठी जास्त शिक्षक नेमणे आर्थिक टंचाईमुळे व शिक्षकांच्या दुर्मिळतेमुळे शक्य होत नाही. तांत्रिक साधनांच्या साहाय्याने काही उणिवा दूर करण्याची धडपड अनेक देशांत सुरू आहे.


(आ) शिक्षक-विद्यार्थी-सहकार्य : खऱ्या शिक्षणासाठी शिक्षक-विद्यार्थी-संबंध जिव्हाळ्याचे असावे लागतात. सहकार्यासाठी उद्दिष्टांची एकवाक्यता आवश्यक असते. विद्यार्थ्याला शिकण्याची आच असेल व शिक्षकाला शिकविण्याची तळमळ असेल, तर दोघे एकोप्याने काम करतील. शिक्षक-विद्यार्थी-विसंवादाचे मूळ शिक्षणविषयक अपसमजात आहे. शिक्षण म्हणजे प्रभावी व्यक्तीने संस्कारक्षम व्यक्तीला लावलेले वळण, ही जाणीव समाजात निर्माण झाल्यास शिक्षणकार्य व्यवस्थितपणे चालेल. या जाणिवेतूनच शिक्षक-विद्यार्थीमधील विसंवाद नष्ट होईल. त्यासाठी शिक्षक-पालक-सहकार्याचीही गरज आहे.


(इ) शिस्त आणि शिक्षा : अध्यापन यशस्वी व्हावयाचे असेल, तर वर्गात सुव्यवस्था व शिस्त पाहिजे. त्यासाठी अध्यापनकौशल्यही इष्ट असते. शिस्तीसंबंधीच्या कल्पना आता बदलल्या आहेत. विद्यार्थ्यांनी निमूट बसणे व शिक्षकाने बोलत राहणे, ही शिस्तीची कल्पना मागे पडली आहे. विद्यार्थी पाठात सहभागी होतात, अध्यापनात रुची दाखवितात व ज्ञानग्रहणाला पोषक वातावरण राखतात, म्हणजे शिस्त होय. ती शिक्षेच्या भीतीतून निर्माण न होता विद्यार्थ्याच्या जबाबदारीच्या जाणिवेतून निर्माण व्हावी व ती स्वयंशिस्त असावी.


मानसशास्त्रीय दृष्टीने विद्यार्थांच्या उच्छृंखल, गैरशिस्त व आळशी वर्तनाची कारणे त्यांच्या संगोपनात व संस्कारांत आढळतात. ती कारणे दूर करण्याच्या प्रयत्न करणे योग्य ठरते. काही प्रसंगी शिक्षा करणे अनिवार्य ठरते पण शिक्षेमुळे आपल्यावर अन्याय झाला असे विद्यार्थ्यास वाटले, तर त्यात सुधारणा होणार नाही. शिवाय अध्यापनाला प्रेरणा शिक्षेच्या भितीतून मिळत नाही व मिळणे इष्ट नसते. प्रौढ विद्यार्थ्यांच्या बाबतीत क्वचित कानउघाडणी करून, तर कधी त्यांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना अध्ययनाला प्रवृत्त करता येते.


पहा : अध्यापक-प्रशिक्षण शिक्षण शैक्षणिक मानसशास्त्र.


संदर्भ : 1. Barnard, H. C. An Introduction to Teaching, London, 1965.


           2. Brembeck, C. S. The Discovery of Teaching, Englewood Cliffs, 1962.


           3. Gragia, Alfred de Sohn, D. A. Ed. Revolution in Teaching, New York, 1964.


           4. Mursell, J. L. Successful Teaching, Tokyo, 1964.


           5. Peterson, A. D. C. Ed. Techniques of Teaching, 3 Vols., Oxford, 1965.


           6. Shipley, C. Y. Cann, M. M. Hildebrand, J. Mitchell, G. T. A. Synthesis of Teaching Methods, Toronto, 1964.


           7. Yoakan, G. A. Simson, R. G. Modern Methods and Techiques of Teaching, New York, 1961.


          ८. गद्रे, ल. रा. सर्वसामान्य अध्यापन पद्धती, पुणे, १९६३.


          ९. सोहनी, गो. प्र. अध्यापनपद्धतीची मूलतत्त्वे, पुणे, १९६३.


मराठे, रा. म.

माय मराठी  विषय - मायबोली  माय बोली माझी भाषा अर्थ देते भावनांना, तिच्या रहावे ऋणात वाटते हो माझ्या मना. माझी बोली भाषा ओव्या,अभंगानी सजते, ...